www.24taas.com, मुंबई
आतापर्यंत झालेली तिन्ही विश्व साहित्य संमेलनं घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट झालय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्यासाठी आवश्यक ती घटनादुरूस्ती अद्यापही केलेली नाही. त्यामुळे ही संमेलनं घटनाबाह्य असल्याचं स्पष्ट झालं आहे.
चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन ऑगस्टमध्ये टोरॅन्टो इथं होणारेय. मात्र, संमेलनाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असली तरी, अद्यापही अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने विश्व मराठी साहित्य संमेलने घेण्यासाठी आवश्यक घटनादुरूस्ती न झाल्याने ही संमेलने घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महामंडळाच्या अध्यक्षांनी अजून घटनादुरूस्ती झाली नाही, असे स्पष्ट केल्याने घटनाबाह्य आजवरच्या घटनाक्रमावर शिक्कामोर्तबच केले आहे. त्यामुळे काही महाभाग संमेलनाच्या नावाखाली परदेशवारीची हौस भागवून घेत असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. केवळ परदेशवारीची हौस भागवण्यासाठीच ही संमेलनं भरवण्यात येत असल्याचा आरोप होतोय. साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मात्र २००७ सालीच घटनादुरूस्ती करण्यात आल्याचा दावा केलाय.
दरम्यान, सिंगापूरच्या दुसर्या संमेलनापूर्वी हे संमेलन नियम व घटनाबाह्य असून त्यासाठी सरकारने आर्थिक अनुदान देऊ नये, असा पवित्रा घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देणार्या मुंबई मराठी साहित्य संघाने साहित्य महामंडळाचे कार्यालय औरंगाबादहून आपल्याकडे आल्यावर घटनादुरूस्ती न करताच दुबईचे तिसरे संमेलन पार यथासांग पाडले. आणि आता टोरॅन्टोचीही तयारी सुरू केली.
साहित्य महामंडळाच्या घटनेत विश्व साहित्य संमेलन घेण्याची तरतूद नाही. त्यासाठी घटनादुरूस्तीची प्रक्रिया आहे. ती कशी करावी यासाठी महामंडळाच्या महाराष्ट्रातील चारही घटकसंस्थाच्या वकिलांनी संमेलने घटनाबाह्य आहेत, असे सांगून घटनादुरूस्तीसाठी समिती नेमण्याची सूचना केली. महामंडळाने गेल्यावर्षी सात सदस्यांची घटनादुरूस्ती उपसमिती नेमली. काही नियम केले. घटनादुरूस्तीच्या नियमानुसार ते घटकसंस्थांकडे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र प्रक्रिया पुढे गेली नाही.
तर महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षा उषा तांबे यांनी घटनादुरूस्तीची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलंय. मात्र प्रक्रिया सुरू असली तरी औपचारिक घटना दुरूस्ती अजून झालेलीच नसल्याचं घटना दुरूस्ती समितीचे अध्य़क्ष श्रीपाद जोशी यांनी सांगितलं.
[jwplayer mediaid="31132"]
[jwplayer mediaid="31115"]
[jwplayer mediaid="31190"]
[jwplayer mediaid="31194"]
[jwplayer mediaid="31197"]