शरद राव नरमले, संप एका दिवसासाठीच

संपात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील रिक्षा सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.

Updated: Apr 15, 2012, 05:54 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

संपात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांना धमकावणाऱ्यांवर कारवाईसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील रिक्षा सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या ऑटोरिक्षा युनियनच्या नेत्यांनी माघार घेत केवळ एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे.

 

सरकारनं सीएनजी रिक्षांच्या सुरुवातीचे भाडे दरामध्ये ११ रुपयांऐवजी १२ रुपये म्हणजेच एक रुपयांची वाढ केली आहे. मात्र पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांच्या भाड्यात वाढ केलेली नाही. सव्वा लाख रिक्षा सीएनजीवर तर सव्वा सहा लाख रिक्षा पेट्रोलवर चालतात. त्यामुळं पेट्रोल रिक्षाच्या भाड्यातही वाढ करावी अशी शरद राव यांची मागणी आहे.

 

सोमवारच्या लाक्षणिक संपात फूट पडली असून मनसे आणि शिवसेनाप्रणित रिक्षा युनियन संपात सहभागी होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. संपात सहभागी झाल्यास परमिट रद्द करण्याचा इशारा सरकारनं दिला असला तरी लाक्षणिक संपात मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षा सहभागी होणार असल्यानं प्रवाशांना हा सोमवार त्रासाचाच जाणार आहे. त्यामुळं प्रवाशांना घरातून बाहेर पडताना थोडं लवकरच बाहेर पडावं लागणार आहे.