www.24taas.com, मुंबई
'महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना आपले मंत्री परदेशी दौरे करण्यात मग्न आहेत'. 'अशा मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यात येऊ देऊ नका', 'जिल्हाबंदी करा अशा मंत्र्यांना'. असं म्हणतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारमधील मंत्र्यांवर सरळ सरळ निशाणा साधला आहे. मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते.
महाराष्ट्रातील जनता दुष्काळाच्या तडाख्याने होरपळते आहे. त्याचे सरकारला काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे मनसे आता दुष्काळग्रस्तांना मदत करेल. 'महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे', 'त्यासाठी मनसे पुढे सरसावणार आहे', 'हा माझा आदेश समजा, दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी याची सोय झाली पाहिजे', असं म्हणतं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सरळ सरळ आदेशच दिला आहे. 'मुंबईहून जी रसद पाठवायची आहे, ती मी पाठविनच', 'पण स्थानिक पातळीवर देखील दुष्काळग्रस्तांना मनसेकडून मदत मिळालीच पाहिजे', 'दुष्काळग्रस्तांना मी भेट देईन, मात्र त्याआधी त्यांना माझ्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे'.
'तरच मी त्यांच्यासमोर जाऊ शकेन', असं म्हणत राज ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मनसे मदत करणार असल्याचे जाहीर केले. तर त्याच बरोबर त्यांनी परप्रांतियांना देखील धारेवर धरलं. 'मुंबईत महाविरांची मूर्ती येऊन २०० वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे एका जैन नागरिकांने जैन बांधवांना घरोघरी आमरस पुरी वाटली'. 'महाराष्ट्रात भीषण अवस्था असताना हे लोक आमरस पुरी वाटतायेत', 'महाराष्ट्रात येऊन पैसे मिळवितात, पण महाराष्ट्रासाठी काहीही देत नाही', असं म्हणून राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.
'हे आमरस वाटणारे कोण आहे हे मी आता शोधून काढणारच आहे', त्यामुळे राज यांनी पुन्हा परप्रांतियांवर टीका केली आहे. तसेच सरकारवरही आपली ठाकरी तोफ डागली आहे. 'या सरकारला दुष्काळाचं काहीही घेणदेणं नाही' , 'मग प्राणी मरो अथवा माणसं'. 'हे आमदार परदेशी जाऊन कसले अभ्यास दौरे करतात' ? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला. 'तर परदेशीवरी करणाऱ्या मंत्र्यांना जिल्हा बंदी करा', असं आ्वाहन त्यांनी जनतेला केलं आहे. तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनाही कामाला लावले आहे. 'दुष्काळग्रस्तांसाठी कामाला लागा', 'दुष्काळग्रस्तांसाठी कामं करा', 'फक्त झेंडे फिरवत बसू नका', 'जिथे गरज आहे त्यांना पाण्याची चाऱ्यांची सोय करा'. असं म्हणत महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.