मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : एखादा राँग नंबर आपल्या आयुष्यात एवढा महत्त्वाचा ठरू शकतो, असा ललिता बन्सीनं कधी विचारही केला नसेल... २०१२ साली अॅसिड हल्ल्याची शिकार ठरलेल्या ललितानं आपल्या 'राईट मॅन' म्हणजेच राहुल कुमारसोबत साताजन्माच्या गाठी मारल्या... या दोघांची ही प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाही... पण, ही रिल लाईफमधली नाही तर रिअल लाईफमधली कहाणी आहे.
आपणही नटावं, छान सजावं.. आपलाही स्वप्नातला राजकुमार असावं असं स्वप्न तिनं कधी तरी पाहिलं असावं आणि तेच स्वप्न मंगळवारी सत्यात अवतरलं. ५ वर्षांपूर्वी भंगलेल्या तिच्या स्वप्नात नवे रंग भरले गेले ते तिच्या लग्न सोहळ्यामुळे. हा सोहळा थोडा खास होता. कारण हे लग्न होतं ललिता बन्सी या ऍसिड हल्ला पीडितेचं. २७ वर्षीय राहुल कुमारशी ललिताचं शुभमंगल मुंबईत थाटात पार पडलं. २०१२ मध्ये झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर लग्न कधी होईल असा विश्वास गमावलेल्या ललिताच्या आयुष्याची जणू ही नवी पहाट ठरलीय.
तिच्या लग्नाचीही एक वेगळी कथा आहे. राहुल कुमारनं चुकून केलेल्या एका फोन कॉलमुळे ललिताचं आयुष्यच बदललंय. त्यानं राँग नंबर डायल केलेला खरा, मात्र तो लागला एकदम राईट. या फोननंतर दोघांमध्ये ओळख झाली. ललिताच्या चेह-यावर नाही तर मनावर प्रेम असल्याचं सांगत त्यानं तिला मागणी घातली.
ललिता २० वर्षाची असताना तिच्या चुलत भावानं तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जवळपास १७ शस्त्रक्रिया झाल्या. आपलं जीवनच उद्धवस्त झाल्याची भावना मनात येऊन तिनं आत्मविश्वास गमावला. मात्र, राहुलसारखा जोडीदार मिळाल्याने ललिताच्या आयुष्याचं नवं सुखद पर्व सुरु झालंय.