www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅम्पाकोलाबरोबरच मुंबईत म्हाडाच्या महागड्या घरांचा विषय गाजतोय. आता त्यावरुनच राष्ट्रवादीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय. त्यामुळे गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला हिरवा कंदील दाखवला, मात्र आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना मेट्रोतून नेलंच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या एमएमआरडीएच्या रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचायला राष्ट्रवादीनं सुरुवात केली. आणि त्याही पुढे जात केवळ हिरवे झेंडे दाखवून लोकांना स्वप्न दाखवू नका अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांवर केलीय.
सांताक्रूझ - चेंबूर लिंक रोड ९ वर्षांपासून रखडलाय. ईस्टर्न फ्री वे प्रकल्प १८ वर्षं रखडलाय.
जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड ११ वर्षांपासून प्रलंबित आहे.
मेट्रो वनचं काम ८ वर्षांपासून सुरू आहे.
मेट्रोच्या दुसरा टप्प्याला अजून सुरुवातच झालेली नाही. मोनो रेलचं काम पाच वर्षांपासून सुरू आहे.
एमयूटीपीचा पहिला टप्पा 11 वर्षांपासून रखडलाय.
एमएमआरडीएबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या म्हाडाच्या घरांच्या किंमतीवरूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. राज्य सरकारी बँकेवर प्रशासक नेमण्याची कारवाई, सिचंनाची श्वेतपत्रिका यासह इतर काही मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला खिंडीत पकडलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीही मुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेसला खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही.