मुंबई : देशभरात गाजलेल्या तेलगी घोटाळ्यावरून आज पुन्हा एकदा विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार अनिल गोटे यांचा 'तेलगीचे मित्र' असा उल्लेख केला. यावरून भाजप आमदारांनी गोंधळ घातला.
त्यानंतर अनिल गोटेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर लाच घेतल्याचे खळबळजनक आरोप केले. मुंबईच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यासाठी आर एस शर्मा यांनी भुजबळांना सहा कोटींची लाच दिली. तसंच तेलगीकडूनही भुजबळांनी चार कोटींची लाच घेतल्याचा सणसणाटी आरोप गोटेंनी केला.
यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये मोठा गोंधळ माजला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं हरकत घेतली. जी व्यक्ती सभागृहात हजर नाही त्यावर आरोप करू शकत नाही. त्यामुळं हे आरोप कामकाजातून काढून टाकावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.