महाराष्ट्र सुन्न : पानसरेंच्या पार्थिवाला सुनेनं-नातवानं दिला अग्नी

 ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार आणि श्रमिकांचे कैवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झालं. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Feb 21, 2015, 10:52 PM IST
महाराष्ट्र सुन्न : पानसरेंच्या पार्थिवाला सुनेनं-नातवानं दिला अग्नी title=

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे पंचत्वात विलिन झाले. असंख्य कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांनी साश्रू नयनांनी या लढवय्याला अखेरचा लाल सलाम केला.

'लाल सलाम... लाल सलाम...' या घोषणांमध्ये कॉम्रेड पानसरेंची मोठी अंत्ययात्रा निघाली. कोल्हापूर शहरानं प्रथमच इतकी मोठी अंत्ययात्रा पाहिली असेल. पानसरे यांच्या पार्थिवावर पंचगंगेच्या काठी अत्यंसंस्कार करण्यात आले. कुठल्याही धार्मिक विधीशिवाय हे अत्यंसंस्कार पार पडले. पानसरे यांची सून आणि नातवानं पार्थिवाला अग्नी दिला.

आयुष्यभर पीडित आणि शोषितांसाठी संघर्ष करणाऱ्या पानसरेंवर सहा दिवसांपूर्वी भ्याड हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांनी मृत्यूला कडवी झुंज दिली. मात्र, या संघर्षात ते अपयशी ठरले. त्यांच्या या दुर्देवी मृत्यूमुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. 

कोल्हापूर बंद... 
कोल्हापुरात जमलेल्या अलोट जनसागरानं कॉम्रेड गोविंद पानसरेंना साश्रू नयनानं अखेरचा निरोप दिला. त्यांच्या कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगर पसरला होता. श्रमिक आणि निराधारांचा आधार असलेल्या लढवय्या पानसरेंसाठी सामान्यांसह दिग्गजांनाही अश्रू अनावर झाले होते. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये बंद पुकारण्यात आला होता. 

पानसरेंच्या अंत्यविधीला डाव्यांचीही अनुपस्थिती
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका होत असतानाच कॉम्रेड पानसरे यांच्या अत्यंतसंस्काराला स्वपक्षीय डाव्या ज्येष्ठ नेतेही अनुपस्थित राहिले. माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश करात, नेत्या वृंदा करात, सीताराम येच्युरी, डी. राजा, निलोत्पल बसू यांच्यापैकी कोणीही या अत्यंसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत. जीवनभर पानसरेंनी ज्या विचारासाठी संघर्ष केला, त्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी त्यांच्या अत्यंसंस्काराकडे पाठ फिरवली.

सायंकाळी ६.०० वाजता
- पंचगंगेच्या काठावर कॉम्रेड गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम
- पानसरेंच्या पार्थिवाला सुनेनं आणि नातवानं दिला अग्नी
- कोणत्याही धार्मिक विधीविना पुरोगामी कॉम्रेड पानसरे यांच्यावर अंत्यसंस्कार
- उपस्थितांना अश्रू अनावर

दुपारी ५.१० वाजता
- उद्याच्या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होणार... सदाभाऊ खोत यांची माहिती
- उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाही पाठिंबा - रामदास आठवले यांनी दिली माहिती

दुपारी ४.३० वाजता

- पानसरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही?, बी जी कोळसे पाटील यांचा संतप्त सवाल
- रविवारच्या महाराष्ट्र बंदला काँग्रेससोबतच राष्ट्रवादीचाही पाठिंबा

महाराष्ट्राचा तालिबान व्होतोय - भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक
- एका सज्जन माणसाचा हा असा अंत होणं, हे माझ्यासाठी खूपच दु:खदायक... पानसरेंची हत
- एखादा विचार संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या खालच्या पातळीवर कुणीच गेलं नव्हतं... विचारांचा सामना विचारांनीच होत होता... सभ्य मार्गानंच होत होता... हा हल्ला हिंदू संस्कृतीला न शोभणारा असाच आहे... अशी मोठ्या व्यक्तींची हत्या देशात इतरत्र कुठेही होत नाही.
- ही अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्राचा तालिबान व्हायला काही वेळ लागणार नाही... याला रोखायलाच हवं.
- महाराष्ट्राला पुरोगामी म्हणताना आपल्याला लाज वाटायली हवी... महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणं म्हणजे खोटं बोलणं, ढोंग करणं
- पोलीस खात्यात काय किंवा सरकारमध्ये काय... सगळी अपात्र माणसं दिसतायत.  
- अमानवीय पद्धतीनं विचारांचा नाश करण्याचा हा प्रयत्न

फडणवीस राजीनामा देणार काय? - माणिकराव ठाकरे

महाराष्ट्रात सनातनी शक्तींचा हैदोस सुरू आहे. पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न होतोय. पुरोगामी विचारांचं संरक्षण होईल, याची काळजी राज्य सरकारनं घ्यावी, अशी मागणी करणारं एक पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. सोबतच, पानसरेंच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही ठाकरेंनी यावेळी केलीय. 

'मुख्यमंत्र्यांनी नाशिकला जाण्याऐवजी कोल्हापुरला उपस्थित राहणं गरजेचं होतं, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय. तसंच, नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असंही माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.   

सोबतच, उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 

उद्या महाराष्ट्र बंद
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. यावेळी, 'पानसरेंचे विचार आम्ही पुढे नेणार' असल्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. सोबतच, महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणं बंद करा, असंही त्यांनी संतापानं म्हटलंय. या बंदचा बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मात्र फटका बसणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असं सीपीायचे सचिव विश्वास उटगी यांनी म्हटलंय. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात... 
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या निधनामुळे एक जुंजार आणि लढवय्या नेता आपल्यातून निघून गेल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. गोरगरीब आणि समाजातील तळागाळातील लोकांसाठी त्यांनी दिलेला लढा आणि योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील... असं म्हणतानाच महाराष्ट्र असले प्रकार कदापि खपवून घेणार नाही. पानसरेंच्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक करण्याचं काम राज्य सरकार करेन असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.  

दुपारी ३.१५ वाजता

- गोविंद पानसरे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
- पंचगंगेच्या काठावर होणार अंत्यसंस्कार

'ब्राह्मणवाद्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही, असं लक्षात करण्यात आल्यानंतर त्यांची हत्या घडवून आणण्यात आली... पानसरे यांना मारलंत पण त्यांचे विचार मारू शकणार नाहीत' - एक प्रतिक्रिया

@ ०२.३२ वा. दुपारी

'रेड सॅल्युट टू पानसरे', 'लाल सलाम, लाल सलाम पानसरे लाल सलाम', पानसरे अमर रहे अशा घोषणा 
 हजारो कार्यकर्त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यदर्शनासाठी केली दसरा चौकात गर्दी

 @ ०२.०० वा. दुपारी

कोल्हापुरातील सर्व व्यवहार आज बंद 

 @ ०१.४० वा. दुपारी

 कार्यकर्त्यांची राज्य सरकार व पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर भाजप सरकारचा धिक्कार 

@ ०१.३२ वा. दुपारी

गोविंद पानसरे यांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर

@ ०१.२८ वा. दुपारी
 कॉ. गोविंद पानसरेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर  

@ ०१.१९ वा. दुपारी

गोविंद पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकात अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

@ ०१.१५ वा. दुपारी

गोविंद पानसरे यांचे पार्थिव दसरा चौकात अंत्यदर्शनासाठी

@ १२.५५ वा. दुपारी

गोविंद पानसरे यांचे पार्थिव कोल्हापुरात दाखल

@ ११.५४ वा. सकाळी

गोविंद पानसरे यांचे पार्थिव कोल्हापूरला रवाना

@ ११.५० वा. सकाळी

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त मीडिया विपर्यास करुन दाखवत आहे - मंत्री चंद्रकांत पाटील

पोलीस हातात दूर्बिन घेवून नव्हते, अस सांगत पाटील यांनी घेतली पोलिसांची बाजू

@ ११.११ वा. सकाळी

गोविंद पानसरे यांच्या निधनानंतरही सरकारची प्रचंड अनास्था.

सकाळपासून राज्य सरकारचा एकही अधिकारी हजर नाही. केवळ तात्याराव लहानेच केवळ हजर.

स्क्रिनिंगवेळी विमानतळावर पैसे मागण्यात आले. सरकारचे कोणतेही आदेश विमानतळावर नव्हते.

@ १०.५६ वा. सकाळी

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा व्यक्तीवर हल्ला नाही...तर व्यवस्थेला दिलेले आव्हान - मुख्यमंत्री फडणवीस

@ १०.२० वा. सकाळी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर दाखल

@ १०.१० वा. सकाळी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पार्थिव ११ वाजता कोल्हापुरात

@ ९.१५ वा. सकाळी

कोल्हापूर बंदचे कम्युनिष्ठ नेत्यांचे आवाहन

@ ९.१२ वा. सकाळी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पार्थिव कोल्हापूरला हलविणार

@ ९.१० वा. सकाळी 

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? - मार्क्सवादी कार्यकर्त्यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल

@ ९.०० वा. सकाळी

दुपारी २ वाजता कोल्हापुरात निघणार अंत्ययात्रा

कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर पार्थिवावर अत्यंसंस्कार

@ ८.४० वा. सकाळी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर मुंबईत मार्क्सवादी कार्यकर्त्यांची निदर्शने.

@ ८.३० वा. सकाळी

कोल्हापुरात दसरा चौकात अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवणार गोविंद पानसरे यांचे पार्थिव 

@ ८.३० वा. सकाळी

गोविंद पानसरे यांचे पार्थिव कोल्हापूरला हलविणार

@ ८.२५ वा. सकाळी

जे जे रुग्नालयातून ९ वाजण्याच्या सुमारास पार्थिव एअरपोर्टला नेणार

@ ८.२० वा. सकाळी

गोविंद पानसरे यांचे शेवटचे अंत्य दर्शन घेण्यासाठी जे जे रुग्णालयात सकाळी ९ वाजेपर्यंत ठेवणार पार्थिव

@ ८.१८ वा. सकाळी

कॉम्रेड गोविंद पानसरेंनी रोवलेले बीज वाया जाणार नाही - शरद पवार
विचाराला विचाराने उत्तर देणे यातच खरं शौर्य, पण जे लोंक विचारांना उत्तर देण्यासाठी भ्याड हल्ला करतात ती लोकं कधीच यशस्वी होणार नाही - शरद पवार

@ ८.१५ वा. सकाळी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतले गोविंद पानसरे यांचे शेवटचे दर्शन

@ ७.१५ वा. सकाळी

मुंबईतील जे जे रुग्णालायत शवविच्छेदन

@ रात्री

- कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या निधनानं आमची चळवळ थंडावणार नाही. पानसरेंचं कार्य असंच पुढे सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया भाकप नेते भालचंद्र कांगो यांनी दिलीय.

- कॉम्रेड गोविंद पानसरेंचं निधन झालं असलं तरी विचारांच्या रुपानं ते आमच्यात असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसंच त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावं अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. 

- कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलंय.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पार्थिव कोल्हापूरला नेणार

मुंबई :  ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार आणि श्रमिकांचे कैवारी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झालं. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी साडेदहा वाजता पानसरे यांचं पार्थिव एअर ऍम्ब्युलन्सनं कोल्हापूरला नेण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी पानसरेंवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात पानसरेंसह त्यांच्या पत्नी उमा पानसरेही जखमी झाल्या होत्या. पानसरेंवर गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापुरातल्या ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारांना पानसरे प्रतिसादही देत होते. तिथं त्यांच्यावर तीन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. 

प्रकृती स्थिर असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला हलवण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी त्यांना पुढील उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्समधून मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र रात्री दहा साडेदहाच्या सुमारास त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर त्यांना रक्ताची उलटीही झाली. 

प्रकृती अधिकच खालावल्यामुळे रात्री अकराच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. अशी माहिती त्यांच्या उपचारांवर देखरेख करणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पानसरे यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांनी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये जाऊन कॉम्रेड पानसरेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.