मुंबई : राज्यातील १०० टक्के शाळा प्रगत करण्यासाठी आधी शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापकांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशांतील शाळांना देण्यात येणाऱ्या भेटींना आणि अभ्यास दौऱ्यांना स्व-खर्चाने सहभागी होण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.
अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी एक वेबसाईट लिंकही शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यावर शिक्षकांना आपापली माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.
दौऱ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांपैकी प्रगत, नवोपक्रमशील शाळांमधील शिक्षक, अशा शाळा विकसित करणारे पर्यवेक्षकिय अधिकारी आणि ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे अशांनाच प्राधान्य दिलं जाईल, असे शासन निर्णयात नमूद केलंय.
परंतु हा अभ्यास दौरा प्रत्येक शिक्षकाने स्वखर्चानेच करायचा आहे, हेही स्पष्ट केले आहे. शिक्षकांनी जाण्याची परवानगी देणे, एवढीच शिक्षण विभागाची भूमिका आहे.
या दौऱ्यांना कुणालाही कुठलीही आर्थिक मदत दिली जाणार नाही. सध्या विभागाकडे १८६ शिक्षकांचे अर्ज आले आहेत. त्यापैंकी ४० जणांची पहिली बॅच नोव्हेंबर महिन्यात सिंगापूरला जाणार आहे.
शैक्षणिक गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ (पिसा) या अहवालानुसार आशिया खंडातील सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग हे देश सर्वात पुढे असल्याचे समोर आलंय. त्यामुळे राज्यातील शिक्षकांसाठी सिंगापूर इथं अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलाय.