बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तांचा उत्साह शिगेला, यंत्रणा सज्ज

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात आज दहा दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Updated: Sep 15, 2016, 08:11 AM IST
बाप्पांना निरोप देण्यासाठी भक्तांचा उत्साह शिगेला, यंत्रणा सज्ज title=

मुंबई : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात आज दहा दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

पोलिसांना हायअलर्ट

विसर्जन मिरवणुकीवेळी जवळजवळ अर्धी मुंबई रस्ते किंवा चौपाट्यांवर असेल. अशा वेळी गर्दीचा फायदा घेऊन घातपात होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची सूचना मिळावी आणि तो परतवून लावता यावा, यासाठी पोलिस यंत्रणा हाय अॅलर्टवर असेल.  

आज होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतर आता मिरवणुकीत कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत.  

पालिकेचे ७५०० कर्मचारी तैनात 

मुंबईत समुद्र चौपाटी, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रीम तलाव अशा शंभर ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलीय. त्यात ६९ नैसर्गिक स्थळांवर तर ३१ कृत्रिम तलाव साकारण्यात आले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेचे सुमारे साडे सात हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. पालिकेने राज्य सरकार, पोलीस, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, सामाजिक संस्था, खाजगी रुग्णालय आदींच्या सहकार्याने विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील विसर्जन स्थळी ८४०, स्टील प्लेट, ५८ नियंत्रण कक्ष, ६०७ जीवरक्षक, ८१ मोटारबोट, ७४ प्रथमोपचार केंद्र, ६० रूग्णवाहिका, ८७ स्वागत कक्ष असा लवाजमा तैनात ठेवण्यात आलाय.