मुंबई : मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवर २०१५ च्या मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे २०१६चे रात्री जल्लोषात स्वागत केले.
तांबड्या आसमंतात समुद्राच्या लाटांवरती स्वार होत २०१५ला गुडबाय करत सूर्य अस्ताला गेला. तर दुसरीकडं गोव्यातही समुद्राच्या बीचेसवर २०१५ला निरोप देण्यासाठी आणि थर्टी फर्स्टचा जल्लोष करण्यासाठी अलोट गर्दी जमलीय. गोव्यातही २०१५च्या सूर्यास्ताचं मनमोहक दृश्याचा लाभ गोव्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी घेतला.
मरिन ड्राईव्हवर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर आतापासूनच गर्दी व्हायला सुरूवात झालीय. थर्टीफर्स्टला संध्याकाळी गेट वे ऑफ इंडियाला आकर्षक रोषणाई केली होती. ही रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकच नाही तर मुंबईकरही गर्दी करतात. तर रंगात भंग होऊ नये, यासाठी मुंबईचे पोलीसही सज्ज होते.
नवीन वर्षाच्या स्वागतात मुंबईकर गर्क आहेत. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी, शहराच्या एन्ट्री पॉइंटवर करडी नजर ठेवली आहे. ठाणे आणि नवी मुंबईमधून मुंबईत येणा-या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सकाळपासूनच अत्यंत काटेकोरपणे, ही मोहीम राबवली जात आहे.
लोणावळ्यात पर्यटक संख्येत घट
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्यासाठी दरवर्षी लोणावळ्यात मुंबई, पुण्यासह मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. पण गेल्या दोन वर्षांपासून ३१ डिसेंबरला येणारी पर्यटक संख्या सातत्यानं घटताना दिसतेय. ३१ डिसेंबरच्या दुपारपर्यंत टायगर आणि लायन्स पॉईंट तसंच घुबड तलाव, राजमाची पॉईन्ट परिसरामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच पर्यटकांची उपस्थिती दिसत होती.
या घटत्या पर्यटक संख्येसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या समस्यासह शासकीय व्यवस्थांना इथल्या हॉटेल व्यावसायिक जबाबदार धरतायेत. या कारणात तथ्य असलं तरीही मागील दोन वर्षांपासून लोणावळा पोलिसांनी हुल्लडबाज आणि अतिउत्साही पर्यटकांच्या बाबतीत स्वीकारलेले कडक धोरण हेच इथं येणाऱ्या पर्यटकाची संख्या घटण्याचे मुख्य कारण आहे.
नागपुरात सीसीटीव्ही वॉच
नवीन वर्षाच्या आगमनाची जय्यत तयारी नागपुरात असतानाच पोलिसांनीदेखील कंबर कसलीय. शहरातील नवीन वर्षाच्या जल्लोषाला गालबोट लागू नये म्हणून, पोलिसांनी नाकाबंदी केली असून मुख्य ठिकाणी CCTV कॅमेरेदेखील बसवण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरचा जल्लोष सुरु होण्याच्या आधीपासूनच नागपुरात काल रात्री पासून १३६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मद्य पिऊन वाहन चालवू नये असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि दारू बंदी चळवळीचे पुरस्कर्ते डॉ. अभय बंग यांनी केलय.
नाशिकमध्ये नव वर्षाचे स्वागत वेगळ्या ढंगात
सरत्या वर्षाला निरोप आणि येत्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्रास शानदार पार्ट्या दिल्या जातात. मात्र नाशिकमधल्या तरुणांच्या एका गटानं नववर्षाचं स्वागत अगदी वेगळ्या ढंगात करण्याचं ठरवलंय.
सनविवि फाउंडेशन आणि तालरुद्र ग्रुपचे हे सर्वजण सदस्य आहेत. गोदामाई आणि मंदिरामुळे नाशिकची जगभरात ओळख आहे. त्या गोदावरीच्या काठाची स्वच्छता करण्याचा संकल्प या तरुणांनी सोडलाय. पार्टी मध्ये वेळ आणि पैसा वाया घालवत तसंच धांगडधिंगा करण्यापेक्षा, गोदामाईच्या सेवेत घाम गाळणं श्रेष्ठ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.