www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एखाद्या गोष्टीसाठी जर रस्त्यावर येऊन निदर्शने, घोषणाबाजी केल्यास आपल्या मागण्या पूर्ण होतात असा समज तरुणांमध्ये रुढ होत आहे. परंतु हे चुकीचे असून याचा त्रास पोलीस तसेच रस्त्यावरील उपस्थित जमावाला रोखण्यासाठी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना होत असतो.
जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना कधी लाठीचार्ज तर कधी अश्रुधुराच्या नळकांड्या यांचाही वापर करावा लागतो. फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे संदेशाच्या होणाऱ्या देवाणघेवाणीमुळे लोक प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. या वाढत्या समस्येवर मुंबई पोलिसांनी मार्ग काढण्याचे ठरवले आहे. यासाठी ‘एचक्यू डॉट कॉम’ या सोशल अॅप्लिकेशन्सची मदत पोलीस घेणार आहेत. ‘एचक्यू’ सोबत भारतातील सर्वात पहिली सोशल मिडीया प्रयोगशाळा लवकरच उभारण्यात येणार आहे.
या प्रयोगशाळेमध्ये फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया चॅनेल्सवरील लोकांच्या प्रतिक्रिया तपासून त्यांचे विश्लेषण करण्याचे काम येथे होणार आहे. यामुळेच याचा इशारा पोलिसांना आगोदरच या प्रयोगशाळांकडून दिला जाईल त्यामुळे परिस्थिती हाताळणे पोलिसांना सहज शक्य होईल आणि त्यावर शासनाला निर्णय घेणंही सोपं जाईल. तसेच सोशल साईट्सवरुन होणारे संभाषण, त्यामागचा होतू, भावना, यामागे एखादी संघटना किंवा पक्ष आहे का, याचा शोध घेण्याचे कामही एचक्यू करणार असल्याचे सांगण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.