मुंबई : सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून झालेल्या वादानंतर विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. पवईच्या आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये २० वर्षीय तरुणाने स्वतःला चाकूने भोसकून आत्महत्या केली, हा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला.
आयआयटीमधील प्राध्यापकांनी दत्तक घेतलेल्या मुलाने पालकांशी आणि बहिणीशी भांडण झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी हा प्रकार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे भांडण सोशल मीडियावरील त्याच्या एका पोस्टवरून सुरू झाले. त्यानंतर बहीण त्याला समजावत होती. मात्र त्याचा संताप अनावर झाला, आणि त्याने स्वतःला चाकूने भोसकून आत्महत्या केली, हे काही कळण्याच्या आतच झाले.
आई-वडीलही समजावत होते. मात्र, त्याला प्रचंड राग आला. त्यावेळी त्याने 'तुम्हाला माहीत आहे का, मी स्वतःबद्दल काय करू शकतो...', असे म्हणत स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर छातीवर चाकूने भोसकून घेतले, असे पवई पोलिस ठाण्याचे सीनिअर इन्स्पेक्टर बी. के. माधेश्वर यांनी सांगितले.
घरातील कोणाला काही कळायच्या आतच हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, अत्यंत गंभीर जखमा झाल्याने उपचारार्थ दाखल होण्यापूर्वीच त्याचे प्राण गेले. प्राथमिक चौकशीनंतर या घटनेत कोणताही गुन्हेगारी प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट होते.
या घटनेमागे काही मालमत्तेचा वाद असल्याचेही दिसत नाही. कारण वडिलांनी आपल्या सर्व मालमत्तेवरही वारस म्हणून त्याचेच नाव लावले होते. तरीही त्याच्या या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी त्याचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे जबाब घेण्यात येत आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
काही मित्रांच्या मते हा मुलगा सतत चिडणारा होता. याविषयी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हा आमचा व्यक्तिगत विषय आहे, असे सांगून काहीही बोलण्याचे टाळले. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.