www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
दहीहंडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा थरथराट सुरू होईल. लाखालाखांच्या बक्षिसांच्या आमिषाने उंचच उंच हंड्या फोडण्यासाठी गोविंदा एका पायावर सज्ज होतील. पण दहीहंडीचा हा थ्रिलिंग जल्लोष काहींना आयुष्यभराची सजा देऊन जातो. अशीच एक करूण कहाणी.
दहीहंडी म्हटले की दयानंदला आठवतो तो उत्साह, जल्लोष आणि थरार... पण या थराराला एक काळी किनारही आहे. २००८ मध्ये चाळीतल्या गोविंदांसोबत दहीहंडी फोडण्यासाठी तो मोठ्या उत्साहात गेला, पण घरी परतला तो या दोन कुबड्यांची सोबत घेऊनच. दहीहंडीसाठी लावलेला मानवी थर दयानंदच्या अंगावर कोसळल्यामुळं त्याच्या मानेला मोठी दुखापत झाली. कधीकाळी नोकरीवर असलेला ३० वर्षीय दयानंद गेल्या पाच वर्षांपासून घरीच आहे. डिलाईल रोडवरच्या वाणी चाळीत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबांसह राहतोय.
आग्रीपाड्याच्या बीआयटी चाळीतल्या योगेश खताते या गोविंदाचीही हीच कथा आणि तीच व्यथा. आई-वडिलांचा एकुलता एक असलेला योगेश २०११मध्ये दहीहंडी सराव शिबिरावेळी चौथ्या थरावरुन पडला आणि वयाच्या २१व्या वर्षीच हातात कुबडी आली. त्यामुळं शिक्षणही अर्धवट सोडावं लागलं. नोकरी करण्याची इच्छा आहे, पण नोकरी मिळत नाही. ज्या वयात घरची जबाबदारी सांभाळायची, त्या वयात घरच्यांनाच याला सांभाळण्याची दुर्देवी वेळ आलीय.
दरवर्षी त्यांच्यासारखे जवळपास ८०० गोविंदा दहीहंडी फोडताना मुंबईत जखमी होतात. त्यापैकी सुमारे ४५० गोविंदांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावे लागते. यापैकी दरवर्षी सरासरी 3 गोविंदा गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग होतात.ऐन तारूण्यात अंथरूणावर पडून राहण्याची वेळ या जखमी गोविंदांवर येते. समोर उभं आयुष्य अजून पडलेलं असताना त्यांच्यावर परावलंबी राहण्याची वेळ आलीय.
दहिहंडी खेळण्यासाठी उंचच उंच थर रचणारी ही तरूण मुले मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील आहेत. दहीहंडी मंडळ, राजकीय नेते थोडे दिवस आर्थिक मदत करतात, पण त्यानंतर जे भोगावं लागतं ते या गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना. लाखालाखांच्या हंड्यांचे आमीष दाखवणा-या आणि गोविंदाचा इवेन्ट बनवणा-या राजकीय नेत्यांनी दहीहंडीला मार्केटिंगचं स्वरूप आणलं. या नेत्यांची एक दिवसाची मजा होते, पण सजा भोगावी लागते ती या जखमी गोविंदांना तिही कायमची.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ