तरुणीवर प्राणघातक हल्ला, ब्लेडने केले चेहऱ्यावर वार

मुंबईता महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अश्‍लील शेरेबाजी व छेडछाड काढून एका स्थानिक गुंडाने १७ वर्षीय तरुणीच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार केल्याची घटना शनिवारी रात्री अंधेरी पश्‍चिमेला घडली.

Updated: Oct 8, 2012, 05:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईता महिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. अश्‍लील शेरेबाजी व छेडछाड काढून एका स्थानिक गुंडाने १७ वर्षीय तरुणीच्या चेहर्‍यावर ब्लेडने वार केल्याची घटना शनिवारी रात्री अंधेरी पश्‍चिमेला घडली. याप्रकरणी डी.एन.नगर पोलिसांनी तरुणीवर प्राणघातक हल्ला करणार्‍या वर्रिश कुरेशी याला अटक केली आहे.
पीडित मुलगी काही कारणास्तव बाहेर पडली असता कुरेशीने तिला बघून अश्‍लील शेरेबाजी केली, तसेच तिची छेडदेखील काढली. त्यामुळे तिने पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे अधिकच खवळलेल्या कुरेशीने नजीकच असलेल्या सलूनमधून ब्लेड घेतले व प्रीतीच्या गालावर व ओठांवर सपासप वार केले.
यात जखमी झाल्यामुळे तिला तत्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेप्रकरणी कुरेशी याला आज अटक केली. गेल्या कित्येक महिन्यांपासून कुरेशी प्रीतीची छेड काढत होता. बेकार असलेला कुरेशी स्थानिक गुंड असून परिसरातील तरुणींची छेड काढत असतो.