मुंबई : एक स्वरसम्राज्ञी आणि एक स्वरराज यांची अनोखी मैफल लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. लता मंगेशकरांचं गाणं आणि राज ठाकरेंची संकल्पना यातून साकारलेली एक अद्भूत कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे.
आपल्या स्वर्गीय सूरांनी श्रोत्यांचं भावविश्व व्यापून टाकणारी ही सूरसम्राज्ञी. लतादिदी. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगासाठी दीदींचं एकतरी गाणं आहेच. आपल्या दैनंदिन जीवनाशी एकरुप झालेली त्यांची हजारो गाणी म्हणजे आनंदाचा अनमोल ठेवाच.
अल्मबच्या रूपानं रसिकांनी लतादिदींना आपल्या कानामनात साठवून ठेवलंय. मात्र लवकरच त्या पुस्तकरूपानं रसिकांच्या भेटीला येत आहेत. थँक्स टू राज ठाकरे. राज ठाकरेंनी निर्माण केलेली बाळासाहेब ठाकरेंची फोटोबायोग्राफी प्रचंड गाजली. आता तेच राज ठाकरे लतीदीदींच्या निवडक तीनशे गाण्यांचं संकलन रसिकांच्या दरबारात सादर करणार आहेत पुस्तकरूपानं.
या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यातलं प्रत्येक गाणं लतादीदींच्या हस्ताक्षरात रसिकांपुढं येणार आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लतादीदींच्या पुढ्यात गाण्याचा कागद असतो. ते गाणं त्या स्वतः लिहून काढतात. अशा जवळपास ३ हजार हँडरिटन गाण्यांचा खजिना लतादीदींनी राज ठाकरेंकडे सुपूर्द केलाय. त्यातली निवडक, अविस्मरणीय गाणी जशीच्या तशी स्कॅन करून, ती रसिकांच्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न राज ठाकरे आणि त्यांची टीम करतेय.
आजवर देश-विदेशात लतादीदींचे शेकडो जाहीर कार्यक्रम झाले. त्यातली गाणी एका जाडसर कागदावर लिहून काढण्याची दीदींची पद्धत आहे. त्याला साँग शीट्स असं म्हणतात. अशी ऐतिहासिक मूल्य असणारी साँग शीट्स मूळ स्वरुपात छापली जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या गीतांची निवड खुद्द दीदींनीच केलीय.
या साँगबायोग्राफीत गाण्याशी संबंधित किस्सा किंवा छोटी आठवणही सोबत शब्दबद्ध केली जाणाराय. याकामात त्यांची भाची रचना शाह यांनी खास रस घेतलाय. तर पुस्तकाचा आकृतीबंध, छपाई, स्टाईल या सगळ्याकडं राज ठाकरे जातीनं लक्ष पुरवतायत.
हे पुस्तक म्हणजे लतादिदींच्या सांगितीक आयुष्याचा प्रवास असणार आहे. किंबहुना सिनेसृष्टीच्या साठ वर्षांचा सुरेल आणि सुरेख आलेख असंच त्याचं वर्णन करावं लागेल. हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगापासून ते अगदी कालपरवाच्या सिनेमापर्यंत लतादिदींचा हा आवाज रसिकांच्या हृदयात घर करून राहिलाय. आता येत्या फेब्रुवारीत लतादिदींच्या सदाबहार गाण्याचं हे पुस्तक प्रकाशित होईल. आणि हा अनमोल ठेवा रसिक घराघरात जपून ठेवतील, हिच अपेक्षा आहे.