मुंबई : लोकल ट्रेनमधली गर्दी आणि त्यासाठीची धावपळ मुंबईकरांच्या जीवावर बेतणारी ठरलीय. रेल्वेच्या धावपळीचा मुंबईकरांवर किती ताण येतो, याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेन्स आणि रेल्वे स्टेशन परिसरात 607 लोकांचा हॉर्ट अटॅकनं मृत्यू झालाय. ट्रेनमधल्या रोजच्या प्रवासाचा, गर्दीचा ताण आल्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो, आणि त्याचंच रुपांतर हार्ट अॅटॅकमध्ये होऊन प्रवाशांना जीव गमवावा लागत असल्याचं, डॉक्टरांचं म्हणणं आहे.
पिकअवर्समध्ये एका ट्रेनमध्ये सरासरी साडे पाच हजार प्रवासी असतात. ट्रेनची क्षमता मात्र साडे तीन हजार आहे. तब्बल दोन हजार प्रवासी जास्त असतात. स्वाभाविकच मुंबईकर अत्यंत गर्दीतून प्रवास करतात. लोकल ट्रेन पकडण्यासाठीची धावपळ, गर्दी आणि भांडणं या सगळ्याचा मुंबईकरांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतोय.