www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.
वर्सोवा ते आझादनगर स्थानकादरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरात ही चाचणी घेतली जाणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा स्थानकातच आणण्यात आली.
तब्बल सहा वेळा विविध कारणांमुळे मुदतवाढ घेतलेल्या वर्सोवा ते घाटकोपर या मेट्रो-१ प्रकल्पाचे काम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात सप्टेंबरपर्यंत अंधेरी आणि दुसऱ्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत घाटकोपर स्टेशनपर्यंत धावणार आहे. मेट्रोचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्यात येणार असून मोनोरेल सुद्धा लवकरच सुरु करण्यात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.