मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर आज मनसे नगरसेवकांची मॅच चांगलीच रंगली. मनसेनं क्रिकेट खेळत सत्ताधा-यांचा निषेध केला. दत्तक तत्वावर मैदानं, उद्यानं देण्याच्या धोरणाविरोधात मनसेनं हे क्रिकेट आंदोलन केलं.
मनसे नगरसेवकांनी सभागृहाबाहेरच क्रिकेटचं मैदान थाटून क्रिकेट मॅच सुरू केली . काल महापालिकेनं हे वादग्रस्त धोरण मंजूर करून घेतलं. विशेष म्हणजे भाजपचाही आधी या विधेयकाला विरोध होता. मात्र आयत्यावेळी भाजपने घूमजाव करत या धोरणाला पाठिंबा दिला होता.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा या धोरणाला कडाडून विरोध आहे. मोकळे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. काळजीवाहू तत्वावर दिलेल्या जागांचं रुपांतर जिमखाना, क्लब हाऊसमध्ये केल्याचा पूर्वानुभव असतानाही हे नवं धोरणं मंजूर करण्यात आलंय.