ध्वनी मर्यादेचं उल्लंघन, शिवसेनेला नोटीस!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 15, 2013, 05:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदुषणचा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक दिवाकर बोरकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीये. नोटीशीला २४ तासाच्या आत शिवसेनेला उत्तर देण्यास सांगण्यात आलंय.
शिवाजी पार्क हा सायलेंट झोन असल्यामुळं तिथं ५० डेसिबलची ध्वनी मर्यादा आहे. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्यात ही पातळी ९० ते ९३ डेसिबलपर्यंत वाढल्याचं स्पष्ट झालंय.
गेल्यावर्षीही दसरा मेळाव्यात ध्वनीप्रदुषणाची मर्यादा ओलांडली गेली होती. त्यावेळी कोर्टाच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल कोर्टात सादर होणार आहे. मात्र तत्पूर्वीच यंदाच्या मेळाव्यातही आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यानं आता यापुढं शिवसेनेला परवानगी मिळेल का?, अशी शंका व्यक्त केली जातेय.

मर्यादा उल्लंघन...
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेले मनोहर जोशी यांचा यंदा दसरा मेळाव्यात अपमान झाला. जोशीसर स्टेजवर येताच समोर नेम धरून बसलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. नुसत्या विरोधी घोषणा देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत जोशीसरांना अपमानित केलं... हे मर्यादा उल्लंघन नवं असलं, तरी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन नेहमीचंच आहे. यंदाही ध्वनीप्रदुषण मर्यादा ओलांडल्या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेला नोटीस बजावलीये... एकूणच यंदाचा शिवसेना दसरा मेळावा उल्लंघनांसाठी गाजतोय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.