व्हॉट्स अॅपवरच्या भांडणानंतर मित्राला भोसकलं

व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुपवर झालेल्या भांडणाच्या रागातून एका मित्रानं दुसऱ्याला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

Updated: Sep 4, 2016, 09:16 PM IST
व्हॉट्स अॅपवरच्या भांडणानंतर मित्राला भोसकलं

मुंबई : व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुपवर झालेल्या भांडणाच्या रागातून एका मित्रानं दुसऱ्याला भोसकल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. 26 वर्षांचा मनिष शहा आणि 21 वर्षांचा श्रेयस नवलकर हे दोन मित्र बॉन्ड नावाच्या ग्रुपमध्ये होते. 

या ग्रुपमध्ये मनिष आणि श्रेयस यांच्यामध्ये वादावादी झाली. यानंतर मनीष ग्रुपमधून बाहेर पडला. ग्रुप सोडल्यानंतरही मनीषचा श्रेयसवर राग होता आणि यानंतर मनीषनं श्रेयसवर हल्ला केला. 

ग्रुप सोडल्यानंतरही श्रेयस फोन करून त्रास देत असल्याचा आरोप मनिषनं केला आहे. शुक्रवारी या दोघांचा मित्र असलेल्या जय सोनीनं मनीषला फोन केला, त्यावेळी श्रेयसही तिकडेच होता. यावेळीही श्रेयस मनिषला काहीतरी बोलल्यामुळे मनिषचा राग अनावर झाला आणि तो श्रेयसच्या इकडे पोहोचला. 

तिथे पोहोचल्यावर मनिषनं श्रेयसवर चाकूनं हल्ला केला. हा चाकू श्रेयसच्या पोटात 5 इंचांपर्यंत आत गेला. हल्ल्याच्यावेळी मनिषनं चाकूवरच्या रेक्झिनचं कव्हरही काढलेलं नव्हतं. चाकूचं हे कव्हर श्रेयसच्या पोटामध्येच फाटलं. श्रेयसची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. याप्रकरणी मनिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.