www.24taas.com, मुंबई
दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीचा मानबिंदू ठरलेल्या मेट्रोला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाली. २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्ली मेट्रो सुरु झाली होती. पहिला आठ किलोमिटरचा टप्पा सुरु झाला होता. १० वर्षात दिल्ली मेट्रो १८५ किलोमिटरपर्यंत वाढलीय. दिल्ली मेट्रो यशस्वितेचे मैलाचे दगड सर करीत असताना मुंबई मेट्रोला मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
मुंबईतील वाहतूक सुधार प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एमएमआरडीएनं यावर्षीही नागरिकांची घोर निराशा केली. मेट्रो आणि मोनो रेल्वेचं स्वप्न एमएमआरडीए काही प्रत्यक्षात आणू शकलेली नाही. तर यावर्षीही अनेक प्रकल्प एमएमआरडीए पूर्ण करु शकली नाही. मुंबई मेट्रोच्या पहिला टप्पा सुरु होण्यास तारीख पे तारीख मिळतेय. तर दुसरा टप्पा अजुनही कागदावरच आहे. पहिला टप्पा, वर्सोवा ते घाटकोपर सुरु होण्यात असंख्य अडचणी आहेत. मोनो रेल्वेचीही वेगळी अवस्था नाहीय. मोनोचा चेंबूर ते वडाळा हा मार्ग २०१२ मध्ये कार्यान्वित होणार होता. मात्र, त्यालाही अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.
२०१२ मध्येही एमएमआरडीएनं मुंबईकरांची घोर निराशा केलीय. कारण मेट्रो आणि मोनो रेल्वेसहित अनेक प्रकल्प रखडलेत. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड तसंच मिलन फ्लायओव्हर यावर्षीही पूर्ण होऊ शकला नाही. पूर्व उपनगरातील वाहतूक वेगवान करणारा ईस्टर्न फ्री वे आता पुढल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. गेली अनेक वर्ष रखडलेला न्हावाशेवा-शिवडी या २२ किमीच्या सागरी सेतूच्या बांधकामामधील अडथळे अखेर यावर्षी दूर झाले. मात्र बांधकामाला पुढल्या वर्षी सुरूवात होण्याची आशा आहे तर २००९मध्ये भूमिपूजन झालेल्या मेट्रो-दोनच्या कामाला यंदाही मुहूर्त सापडलेला नाही.
मेट्रो रेल्वेचा पहिला मार्ग कधी सुरू होतो याचीच २०१२ मध्ये मुंबईकरांना उत्सुकता होती. मात्र, या प्रकल्पाची डेडलाईन पुन्हा एकदा पुढल्या वर्षापर्यंत ढकलली गेलीय. तसंच मेट्रो रेल्वेची अधिकृत चाचणीही या वर्षात होऊ शकलेली नाही. आता तर मेट्रो रेल्वेमार्ग २०१३च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मात्र, एमएमआरडीएचा हा दावाही खोटा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणण आहे.
मेट्रोप्रमाणे मोनो रेल्वेचीही काहीशी अशीच अवस्था आहे. मोनो रेल्वेचा चेंबूर ते वडाळा मार्ग पुढल्या वर्षी कार्य़ान्वित होणार आहे. पण मोनो रेल्वेची चाचणी यशस्वी होऊन आता ती संपूर्ण मार्गावर धावू शकतेय हीच काय ती मुंबईकरांसाठी समाधानाची बाब... तेव्हा २०१३ मध्ये तरी मुंबईकरांचा प्रवास मेट्रो आणि मोनोमधून होईल अशी आशा आहे.