नारायण राणे भाजपच्या वाटेवर नाहीत- नितेश राणे

नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर नाहीत, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया खुद्द नारायण राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी दिली आहे.

Updated: Mar 28, 2017, 06:01 PM IST
नारायण राणे भाजपच्या वाटेवर नाहीत- नितेश राणे  title=

मुंबई : नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर नाहीत, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया खुद्द नारायण राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार नितेश राणेंनी दिली आहे. तसंच व्यक्तिगत कामासाठी राणे दिल्लीला गेल्याचंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे.

मी छातीठोकपणे सांगतो की आम्ही काँग्रेसमध्येच आहोत. आमच्याबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार केले जाते आहे. आमची भावना आहे की नारायण राणेंनी काँग्रेस पक्ष मोठा करावा. पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष सत्तेत यावा. पक्ष वाढवायचाय, वाचवायचा म्हणून बोलत आहोत, असं नितेश म्हणालेत.

आमच्या विरोधात अविश्वासाचे वातवरण तयार करणाऱ्यांबाबत माझ्याकडे पुरावे नाही त्यामुळे पुरावे असतील तर ते मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडेन असं राणेंनी सांगितलंय.  

मला राज ठाकरे यांची भाषण शैली आवडते म्हणून मी मनसेत प्रवेश करणार का ? मला शरद पवार यांचे व्यक्तिमत्व प्रभावित करते म्हणून मी राष्ट्रवादीत जाणार आहे का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.

राजकारणात जर-तर ला अर्थ नसतो. आज काय त्याला महत्व. मला लोकानी काँग्रेसचा आमदार म्हणून निवडून दिलेय. पंजाब मध्ये जसे लढलो तसे महाराष्ट्रातही शक्य आहे. फक्त सर्व एकसंघ असण्याची गरज आहे. तसे झाले तर 2019 ला काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवू शकतो, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे.

राजकीय भूकंपाचे सूतोवाच नारायण राणेंना त्यांच्या शैलीने करावे लागतात. आम्ही कधीही बोललो नाहीये की आम्हला काँग्रेस सोडायची आहे, असंही राणे म्हणालेत. मी उद्या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहे. राणे साहेब सहभागी होणार नाहीत. विरोधी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सभागृहात आवाज उठवतील आणि विधानसभेचे आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होतील ही व्यूहरचना आधीच ठरलेली आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिलीये.

आज आम्ही काँग्रेसमध्ये आहोत, भविष्यात काय होईल यासाठी ज्योतिषी पकडावा लागेल. काँग्रेस सोडण्याचा विचार आज मनातही नाही. आम्ही रिझल्ट देत आहोत, पक्ष मजबूत व्हावा यासाठी बोलत आहोत. जे बोलत नाहीत त्यांना कदाचित पक्षाच्या भवितव्याची चिंता नसावी, असं सूचक वक्तव्यही नितेश राणेंनी केलंय.

काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी राणे साहेबांच्या संपर्कात आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. आमच्या मतांची योग्य दखल घेतली जाईल. काँग्रेस म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं सांगायलाही नितेश राणे विसरले नाहीत.