माझ्या चेहऱ्यावर वाडियानं जळती सिगारेट फेकली - प्रीती

30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेपूर्वी नेसनं आपल्या चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली होती तसंच आपल्याला एका रुममध्येही बंद करून टाकलं होतं, असंही प्रीतीनं आता म्हटलंय. 

Updated: Jul 23, 2014, 08:21 AM IST
माझ्या चेहऱ्यावर वाडियानं जळती सिगारेट फेकली - प्रीती title=
फाईल फोटो

मुंबई : उद्योगपती नेस वाडिया याच्यावर छेडछाडीचा आरोप लावणाऱ्या प्रिती झिंटानं आपल्या माजी प्रियकरावर आपल्याला भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर प्रताडित करण्याचा आरोप केलाय. 30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेपूर्वी नेसनं आपल्या चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकली होती तसंच आपल्याला एका रुममध्येही बंद करून टाकलं होतं, असंही प्रीतीनं आता म्हटलंय. 

वानखेडे स्टेडियममध्ये कथित छेडछाड आणि अपमानाच्या घटनेनंतर प्रीतीनं वाडियाविरुद्ध पोलिसांमध्ये रितसर तक्रार नोंदविली होती. 

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिलेल्या पत्रात प्रीतीनं ही गोष्ट उघड केलीय. ‘काही काळापासून नेस माझ्या प्रती जास्त आक्रमक आणि हिंसक होत होता... माझ्या चेहऱ्यावर जळती सिगारेट फेकण्यापासून... मला एका रुममध्ये बंद करणं आणि मला अपमानास्पद वागणूक देण्यापर्यंत... मी या त्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात’ असं प्रीतीनं म्हटलंय. 

प्रीतीनं मारिया यांना 30 जून रोजी हे पत्र सोपवलं होतं. परदेशात जाण्याची परवानगी मागण्यासाठी ती मारिया यांना भेटली होती. 

या प्रकरणाच्या चौकशीमध्ये सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रीतीनं ‘मला फक्त एव्हढचं वाटतंय की त्याला (वाडियाला) माझ्यापासून दूर ठेवलं जावं, त्यामुळे मी निर्भयतेनं तरी जगू शकेल... नाहीतर एखाद्या दिवशी दुदैवानं रागाच्या भरात तो मला ठारही मारू शकतो आणि मला याचीच भीत वाटतेय’ असंही या पत्रात म्हटलंय. 

‘पोलिसांत तक्रार दाखल करून त्याला (वाडियाला) नुकसान पोहचविण्याचा माझा कोणताही हेतू नाही. पण, स्व-संरक्षणासाठी मला पोलिसांकडे येण्यावाचून दुसरा पर्यायही उरला नव्हता. भविष्यात तो सरळसरळ किंवा इतरांच्या मदतीनं मला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न करेन आणि त्यामुळेच मी खरोखरच खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे’.

गेल्या 12 जून रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत प्रीतीनं नेस वाडियावर, 30 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर आपली छेडछाड करण्याचा, अपमानास्पद भाषा वापरल्याचा आणि धमकी देण्याचा आरोप केलाय. हे दोघेही किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान सुरु असलेली आयपीएल मॅच पाहण्यासाठी उपस्थित मैदानावर उपस्थित होते. आयपीएल टीम किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये प्रीती आणि वाडिया या दोघांचाही मालकी हक्क आहे. 

वाडियानं प्रीतीच्या आरोपांना धुडकावून लावलंय. दरम्यान, प्रीतीनं पत्राद्वारे उघड केलेल्या या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यासाठी वाडिया ग्रुपचा कोणताही प्रतिनिधी उपलब्ध नव्हता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.