नोटबंदीनंतरचं कामाठीपुरा...

डिमॉनिटायझेशन.... ई पेमेंट, पेटीएम हे सगळे शब्दही माहीत नाहीत, अशीही एक दुनिया आहे.... इथे चालतो फक्त रोकडा.... सगळे व्यवहार कॅशवरच.....  मग मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथे नेमकं काय घडलं....  एक रिपोर्ट कामाठीपुरामधून...... 

Updated: Nov 30, 2016, 04:28 PM IST
नोटबंदीनंतरचं कामाठीपुरा... title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : डिमॉनिटायझेशन.... ई पेमेंट, पेटीएम हे सगळे शब्दही माहीत नाहीत, अशीही एक दुनिया आहे.... इथे चालतो फक्त रोकडा.... सगळे व्यवहार कॅशवरच.....  मग मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथे नेमकं काय घडलं....  एक रिपोर्ट कामाठीपुरामधून...... 

 

कामाठीपुरा..... बहिष्कृत स्त्रियांचं हे उद्ध्वस्त जग........ इथे रात्री दिवस सुरू होतो.... आणि रात्र, ती तर कधी संपतच नाही...... चेहरे रंगवलेली ही भडक रंगांची  दुनिया.....  'एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग'  ही इथली सभ्यता. 

माणसांची, वाहनांची गर्दी... वखवखलेल्या नजरा... डोळ्यांत जनावराची भूक.. सावज शोधणा-या नजरा.... माणसाचं भेसूर रूप म्हणजे कामाठीपुराचा आरसा...

उद्याच्या आशेवर इथल्या स्त्रियांचं जगणं धुगधुगत असतं... हातात पैसे पडले की कामाठीपुराची स्वप्न खुळखुळू लागतात.....  खरा पैसा नि खोटी स्वप्नं... पैसा फेको, तमाशा देखोचाच हा सगळा बाजार..... आज रोकडा मिळाला तर उद्याची चिंता मिटली.... परमेश्वर, परिस्थिती की प्राक्तन...काहीही म्हणा....कामाठीपुराच्या या चौदा गल्ल्यांमध्ये देहविक्रय चालतो. हाच इथला व्यापार आणि व्यवहार.... चलनशुद्धीचा जबरदस्त फटका बसला या कामाठीपुराला..... कारण इथल्ले सगळेच जण रोकड्यावर जगतात.... कॅश है तो मामला सेट है...... 
हा धंदा Cash transactionवर चालतो. हीच ह्या जगाची कळ आणि किल्ली ..... 

चलनशुद्धीमुळे कामाठीपुराची सगळी अर्थव्यवस्थाच साफ खिळखिळी झाली..... अनेकांची बँक खातीच नाहीत. चेक, एटीएम, पेटीएम यांचा काही संबंधच नाही....

सौ-पाचसौका नोट, फार तर हजार का नोट....यावरच इथल्या सगळ्यांचं जगणं तग धरून होतं.... पण पाचशेची जुनी नोट बंद झाली, आणि ग्राहकानं दोन हजारांची नोट दिली तर सुट्टे कोण आणि कसे देणार ?..... सगळा घोळ सुट्ट्या पैशांनी केला.... 

गेल्या काही दिवसांत इथले बहुतांश व्यवहार ठप्प झालेत.... मुळात हाती पैसाच नाही, त्यामुळे ग्राहकच फिरकेनात, अशी अवस्था आहे...मुळातच नितीच्या या खुल्या बाजारात सारं काही निराशावादीच वाटत असताना, आशेची एक पालवी इथेही रुजतेय.... परिवर्तन हवंसं वाटतंय. 

कामाठीपुरातल्या या महिलांची ना संघटना, ना त्यांच्या खांद्यावर कुणाचा झेंडा.... मूक क्रांती मोर्चा काढण्याइतकी ताकद नाही, ना कुणाचं नेतृत्व..... निवडणुकीच्या नकाशावर प्रत्येक जाती-जमातीचा, वर्गाचा एक मतदारसंघ असतो..... पण या बदनाम गल्ल्यांना जवळ करणारं कुणीच नाही...... 

'औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया' ह्या ओळी लिहिल्या साहीरनं.....पण आज कामाठीपुराच्या बाजारात रोकड्या पैशाची वानवा आहे. आणि हेी व्यथा जगासमोर मांडण्यासाठी साहिरच्या ताकदीचा कवी आज आपल्यांत नाही.