www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
२० वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी आणि १६ वर्षे जुन्या रिक्षा १ ऑगस्ट २०१३ पासून बाद करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणानं घेतलाय.
या निर्णयामुळे मुंबई महानगर परिवहन क्षेत्रातील चार ते पाच हजार टॅक्सी आणि १४ ते १५ हजार रिक्षा बाद होणार आहेत. जुन्या वाहनांना बाद करण्याबाबत मागील वर्षीच निर्णय झाला होता.
मात्र त्याच्या अंमलबजावणीची मुदत ठरली नव्हती. काल याबाबत परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली. त्यात एक ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय.
यामुळे आता १ ऑगस्टपासून या जुन्या वाहनांना चालवण्याचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मीरा भाईंदर, नवी मुंबई आणि पनवेल जिल्ह्यातील काही भागांत ही कारवाई होणार आहे.
टॅक्सी -रिक्षा भाडेवाढीला कोर्टाची स्थगिती
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. टॅक्सी आणि रिक्षाची उद्यापासून म्हणजेच १ मेपासून होणारी भाडेवाढ टळलीये. मुंबई उच्च न्यायालयानं भाडेवाढीवर तात्पुरती स्थगिती दिलीये.
भाडेवाढीला आक्षेप घेत ऑक्टोबर २०१२मध्ये मुंबई ग्राहक पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळात हकीम समितीच्या शिफारसीनुसार १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली. यावर हायकोर्टात युक्तीवाद झाला.
कोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत भाडेवाढ करु नये असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशा सुचना कोर्टानं केल्यात. याप्रकरणाची पुढची सुनावणी १२ जूनला होणार आहे.