मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेत. मेहता यांनी पालिकेची धडक कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पालिकेच्या जलअभियंत्यानं केला आहे.
अशोककुमार शामजी तवडीया या पालिका अभियंत्यानं अहवालात मंत्रिमहोदयांचा उल्लेख केला आहे. त्यांचं म्हणणय की, एन वॉर्डात पोकलेन, जेसीबी यांच्यासह पूर्ण तयारीनिशी हे बांधकाम पाडायला गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना सुरूवातीला स्थानिकांनी विरोध केला, आणि त्याचवेळी खुद्द प्रकाश मेहतांनी टिळकनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन दबाव टाकत ही कारवाई थांबवण्यास भाग पाडलं.
हा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर होताच न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए के मेनन यांच्या खंडपीठाने याची गंभीर दखल घेतलीय. टिळकनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिका-याला १५ ते १७ एप्रिल २०१७च्या स्टेशन डायरीसह आज हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. तसेच राज्य सरकारची याबाबत भुमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्त्यांना हजर राहण्याचे आदेश दिलेत.