झोपटपट्टीत राहणाऱ्या रणजीतला ९६ टक्के गुण

भांडूपमधल्या झोपडपट्टी भागात आयुष्य काढलेल्या रणजीत साळुंखेनं दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळालेत. यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढलाय, मात्र पुढचं स्वप्न साकार करण्यासाठी गरज आहे, शुभेच्छा आणि आर्थिक पाठबळाची.

Updated: Jun 22, 2015, 10:31 PM IST
 title=

मुंबई : भांडूपमधल्या झोपडपट्टी भागात आयुष्य काढलेल्या रणजीत साळुंखेनं दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळालेत. यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढलाय, मात्र पुढचं स्वप्न साकार करण्यासाठी गरज आहे, शुभेच्छा आणि आर्थिक पाठबळाची.

भांडुपच्या डोंगराळ भागात दाटीवाटीनं पसरलेल्या झोपडपट्यात राहणारा हा आहे रणजीत साळुंखे... घरची परिस्थिती बेताचीच... रहायला दहा बाय दहाचं छप्पर...वडील कंत्राटी कामगार... आई शिवणकाम करुन घराला हातभार लावते.अशाही परिस्थितीत रणजीतनं दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के मिळवलेत.

कुठलाही खाजगी क्लास न लावता, एकाग्रतेनं अभ्यास करुन त्यानं हे यश मिळवलंय.  मुलाच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून रणजीतच्या आईनं तब्बल सहा महिने शिवणकाम बंद ठेवलं होतं.

केवळ वडिलांच्या तुटपुंज्या कमाईवर घरसंसार सुरू होता. दहावीत ९६ टक्के मिळवून आई-वडिलांचे कष्ट रणजीतनं सार्थकी लावल्यामुळे त्यांना त्याचा अभिमान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रणजीतनं मिळवलेल्या यशाचा अमरकोर विद्यालयाला अभिमान असल्याचं त्याचे शिक्षक सांगतात.

रणजीतचा आत्मविश्वास त्याला मिळालेल्या गुणांमुळे वाढलाय खरा. भविष्यात त्याला मॅकेनिकल इंजीनिअर व्हायचंय. उंच भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखांना हवंय आर्थिक पाठबळ.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.