विद्यार्थ्यांच्या गौरवाचा हृदयस्पर्शी सोहळा; अश्रुंचा बांध फुटला

घरच्या गरीबीवर मात करत, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंतांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. 'संघर्षाला हवी साथ' या उपक्रमाच्या माध्यमातून... कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा अत्यंत हृदयस्पर्शी असा हा सोहळा पाहताना उपस्थितांना गहिवरून आले.

Updated: Jul 11, 2015, 01:33 PM IST
विद्यार्थ्यांच्या गौरवाचा हृदयस्पर्शी सोहळा; अश्रुंचा बांध फुटला title=

मुंबई : घरच्या गरीबीवर मात करत, दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंतांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. 'संघर्षाला हवी साथ' या उपक्रमाच्या माध्यमातून... कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा अत्यंत हृदयस्पर्शी असा हा सोहळा पाहताना उपस्थितांना गहिवरून आले.

'संघर्षाला हवी साथ' या गौरव सोहळ्यातील काही हृदयस्पर्शी आणि भावूक क्षण पाहायला मिळाले. केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही आपल्या भावना अनावर झाल्या. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत, दहावीच्या परीक्षेत यशाची शिखरं गाठणाऱ्या २४ गुणवंत विद्यार्थ्यांचा झी मीडियाच्या वतीनं हृद्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी या विद्यार्थ्यांच्या संघर्षकथा पाहून, प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचेही डोळे पाणावले

परिस्थितीशी झगडणाऱ्या या गुणवंतांची स्वप्नं साकार व्हावीत, त्यांच्या पंखांना बळ मिळावं, यासाठी झी मीडियानं खास मोहीम राबवली... 'मिशन झी २५ तास, संघर्षाला हवी साथ' या उपक्रमाचं यंदाचं हे दुसरं वर्ष... गेल्या वर्षीप्रमाणंच यंदाही मदतीचे हजारो हात पुढं आलं. 'झी मीडिया'चं आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र 'डीएनए'नं सुद्धा 'बिटिंग द ऑड' नावानं कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी असाच उपक्रम राबवला. त्याला सुद्धा वाचकांची उदंड साथ लाभली. 

या सर्व गुणवंतांचा कौतुकसोहळा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाला. या विद्यार्थ्यांची पाठ थोपटण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, ख्यातनाम सिने अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सिने अभिनेते मनोज जोशी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. अत्यंत सकारात्मक अशी ही मोहीम राबवल्याबद्दल मान्यवरांनी झी मीडियाचे खास कौतुक केलं.
 
जिद्दीनं आणि मेहनतीनं यश मिळवणारी ही मुलंच खरे हिरो आहेत, खरे आयडॉल आहेत, अशी भावना यावेळी पाहुण्यांनी बोलून दाखवली.

संघर्षाला साथ देण्याचं हे मिशन यापुढंही अव्याहतपणे सुरू राहील, अशी ग्वाही झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी यावेळी दिली. सामाजिक उपक्रमांमध्ये झी मीडियाचं नेहमीच एक पाऊल पुढं राहिलाय... या हृदयस्पर्शी कौतुक सोहळ्याच्या निमित्तानं त्याचा पुनर्प्रत्यय आला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.