मुंबई : 48 तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राबाबत व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणाच्या भावना दुखविण्याचा विचार नव्हता. एक कला म्हणून त्याकडे पाहा. मी राजकीय व्यंगचित्रकार नाही. कोणाच्या भावनाचा अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे सांगत शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तूनच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो व त्या सदराचे नाव म्हणूनच ‘हसोबा प्रसन्न’ आहे. २५ सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो. या सर्व प्रकरणाचे राजकारण झाले व त्यात ‘शिवसेना’ व ‘सामना’स ओढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. - व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई
दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यात आता शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र सुरु झालं आहे. भोकरदनचे सेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हाभरातून आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा अस्त्र उगारले.
जालन्यातील बदनापूरमधील युवसेनेच्या १३ पदाधिकाऱ्यांनी देखील आपापल्या पदांचे राजीनामे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्याकडे पाठवलेत. दैनिक सामनाच्या २५ तारखेच्या उत्सव पुरवणीत अश्लील व्यंगचित्र छापल्यानं मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून आम्ही सामना वृत्तपत्राचा निषेध करून आमच्या पदांचा राजिनामा देत असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हटल आहे.
दुसरीकडे व्यंगचित्राबाबत शिवसेनेत नाराजीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी नाराज शिवसैनिकांशी चर्चा केली. खासदार प्रतापराव जाधव यांची समजूत काढण्यातही यश आले. शिवसेनेचा कोणताही खासदार राजीनामा देणार नाही. शिवसेनेत कोणीही नाराज नाही असं स्पष्ट करण्यात आले.