एसटी कर्मचारी संपात फूट, लाखो प्रवाशांना संपाचा फटका

राज्यभरातल्या एसटी कर्मचा-यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. प्रवाशांना त्रास नको म्हणून कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र आहे.

Updated: Dec 17, 2015, 03:47 PM IST
एसटी कर्मचारी संपात फूट, लाखो प्रवाशांना संपाचा फटका title=

मुंबई : राज्यभरातल्या एसटी कर्मचा-यांनी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. याचा फटका लाखो प्रवाशांना बसला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. प्रवाशांना त्रास नको म्हणून कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र आहे.

राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ मिळावी यासाठी सर्वात मोठी संघटना इंटक आज बेमुदत संपावर गेलीय. त्यामुळे एसटी डेपोंमधून गाड्या बाहेरच पडलेल्या नाहीत..रोज पोटापाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लाखो प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय. 

कल्याणमध्ये संप मागे
कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. प्रवाशांना त्रास नको म्हणून कर्मचारी कामावर परतले. कल्याणमधून वाहतूक पूर्वपदावर आली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळं संपात फूट पडल्याचं चित्र दिसतंय...

रत्नागिरीतील एसटी सेवा ठप्प 
शेतकऱ्यांप्रमाणे चालक-वाहकही कर्जबाजारी आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्याचा दावा एसटी कर्मचारी संघटनेनं केलाय. रत्नागिरीतही एसटी याचा परिणाम जाणवू लागला आहे यामुळे रत्नागिरीतील एसटी सेवा ठप्प झाली आहे. गावागावातून व एस टी स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. अनेक प्रवासी एसटी डेपोत खोळंबले आहेत. 

नागपूरमध्ये एसटी संपाचा प्रभाव 
नागपूरमध्ये एसटी संपाचा प्रभाव दिसतोय. नागपूर आगरात २००च्या वर एसटी  बसेस थांबविण्यात आल्यात. बस बंद असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होतायत. संपामुळे खाजगी बस चालकांचं फावलंय. भरमसाठ भाडं आकारून अडकलेल्या प्रवाशांची लूटमार केली जातेय. 

इंटकने पुकारलेल्या संपात मनमाड बस स्थानकातील सर्वच कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे एकाही बस सुटलेली नाही. त्यामुळे मनमाड आगारात एस. टी. बसच्या रांगा लागल्या होत्या. प्रवासी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागताय.
 
धुळ्यात दोन संघटनांमध्ये जोरदार वाद 

धुळ्याच्या आगारात वेगळाच प्रकार पुढे आला. एसटीच्या दोन संघटनांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे काही काळ बस बंद होत्या. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु झाली. काही वेळातच पुन्हा बंद करण्यात आली.  गोंधळामुळे  शेकडो प्रवाशी बस स्थानाकारवर अडकून पडले. 

जळगावात गाड्या रोखल्यात
जळगाव आगारात सकाळी नियमित बस सुरु होत्या. मात्र संघटनेने ११ नंतर एकही बस आगाराबाहेर जाऊ दिली नाही. जळगावहून मुंबई पुणे नागपूर नाशिक जाणारे प्रवाशी अडकलेत. बंद पुकारणाऱ्या संघटनेने प्रवाशांना वेठीस धरण्यापेक्षा विधिमंडळात मागण्या माडाव्यात, अशी मागणी संतप्त प्रवाश्यांनी केलीय.
 
बीडमध्ये ४०० फेऱ्या रद्द
तिकडे बीड़ जिल्ह्यातही संपामुळे ११ वाजेपर्यंत जवळपास ४०० फेऱ्या रद्द झाल्यात. जिल्ह्यातले जवळपास ७५० कामगार संपात सहभागी झालेत. बीड जिल्ह्यात ८ एसटी डेपो आहेत.त्यातले सर्व कर्मचारी संपावर आहेत. या संपाचा थेट फटका प्रवाशांना बसतोय. अनेक ठिकाणी बस स्थानकं गर्दीनं भरून वाहतायत.