मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणारे अनेक जण नेहमीच पाहायला मिळतात. ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवाववरही बेतते. हे असले जीवघेणे प्रकार रोखण्याकरता रेल्वे पोलीस पुढे सरसावले आहेत.
त्याचाच भाग म्हणून स्टंटबाजी करताना जखमी झालेल्या एका मुलाचं पोस्टर आता रेल्वे पोलीस जनजागृतीसाठी वापरणार आहेत. भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या आलम खान या १७ वर्षांच्या मुलाचं हे पोस्टर असेल.
पश्चिम रेल्वेवरच्या चर्नी रोड आणि मरीन लाईन्स रेल्वे स्थानकादरम्यान जीवघेणे स्टंट करताना आलम खान रेल्वे खांबाचा धक्का लागून पडला होता. तो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारितही झाला होता.
त्यानंतर रेल्वे पोलिसांनी 'फेस रेकग्निशन अॅप'च्या माध्यमातून त्याला हुडकून काढलं होतं. 'जीवघेणे स्टंट करुन आपलं आयुष्य नष्ट करु नका', असं आवाहन आता आलमच्या माध्यमातून रेल्वे पोलीस करणार आहेत.