कॅम्पाकोलावर हातोडा पडणार? काय होणार रहिवाशांचं?

कॅम्पाकोला बिल्डींग पाडण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहेत. या प्रकरणी हस्तक्षेपास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय. अॅडव्होकेट जनरल यांचं यासंदर्भातलं मत प्रतिकूल आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेपास नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळं कॅम्पाकोलाच्या आशा हळुहळू मावळत चालल्याचं चित्र आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 11, 2013, 10:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅम्पाकोला बिल्डींग पाडण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहेत. या प्रकरणी हस्तक्षेपास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय. अॅडव्होकेट जनरल यांचं यासंदर्भातलं मत प्रतिकूल आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेपास नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळं कॅम्पाकोलाच्या आशा हळुहळू मावळत चालल्याचं चित्र आहे.
कॅम्पाकोला कम्पाऊंडमधले रहिवासी सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. कॅम्पाकोला पाडण्याची सुप्रीम कोर्टानं वाढवून दिलेली मुदत आज संपणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लढा देणाऱ्या रहिवाशांना राजकीय पक्षांकडून आश्वासनांपलिकडे काहीही मिळालेलं नाही.
अशा स्थितीत आजही कम्पाऊंडमध्ये सर्वपक्षीय बैठकीचा फार्सच रंगला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा रदबदली करण्याचं आश्वासन वगळता कॅम्पाकोलाच्या हाती काहीही लागलेलं नाही. केवळ पाठिंबा देण्यावरच ही सर्वपक्षीय बैठक आटोपली. अखेरच्या क्षणी शिवसेना-भाजपनंही आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र प्रत्यक्षात कॅम्पाकोला रहिवाशांना दिलासा देण्याचं सोडून या मुद्द्याचं राजकारण करण्यातच नेत्यांना रस दिसत असल्याचं चित्र आहे.
इमारतीची वीजजोडणी तोडण्याबाबत बेस्टनं नोटीस बजावलीय. इमारतीच्या भिंतीवर ही नोटीस चिकटवण्यात आलीये. यानुसार उद्या इमारतीची वीज तोडण्यात येईल, असं बेस्ट प्रशासनानं कळवलंय. वरळीच्या या कॅम्पाकोला कम्पाऊण्डमध्येच पूर्वी कॅम्पाकोला नावाच्या कोल्ड्रिंकची फॅक्टरी होती. त्यामुळंच हे कम्पाऊण्ड कॅम्पाकोला नावानं ओळखलं जातं.
१९८० साली तीन बिल्डर्सनी या प्लॉटवर सात बिल्डिंग बांधल्या. महापालिकेकडून फक्त पाच मजल्यांची परवानगी मिळाली होती. पण या बिल्डर्सनी बिनदिक्कतपणे सहा बिल्डिंग २० मजल्यांच्या तर एक बिल्डिंग १७ मजल्यांची बांधली.
अनधिकृतपणे कितीही मजले बांधायचे. मग महापालिका त्याबद्दल दंड आकारणार. तो दंड भरायचा. आणि बिल्डिंग अधिकृत करुन घ्यायची. हीच गलिच्छ मोडस ऑपरेंडी वापरत अनधिकृत मजले चढत गेले. १९८४ ते १९८९ दरम्यान महापालिकेनं बांधकाम थांबवण्याची नोटीसही कॅम्पाकोलाला पाठवली. अर्थात ती नोटीस गांभीर्यानं घेतील तर ते बिल्डर कसले. महापालिकेनंही पुढं नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही. १९८६ साली बिल्डरनं कागदावरचा आखीव रेखीव आणि आकर्षक प्लॅन ग्राहकांना दाखवून बिल्डिंगमधले फ्लॅटस विकले आणि स्वतःच्या तुंबड्य़ा भरल्या.

१९८९ सालापासून जवळपास अडीचशे कुटुंबांचे संसार कॅम्पाकोलामध्ये सुरू झाले. मुळात बिल्डिंगमध्ये सगळं काही गोलमाल असल्यानं १९९९ सालापर्यंत पाण्याचं कनेक्शनच नव्हतं. तब्बल दहा वर्षं इथले रहिवासी टँकरमधून पाणी भरायचे. अखेर टॅँकरचं पाणी खालून भरुन थकल्यानंतर रहिवाशांनी पाण्याच्या कनेक्शनसाठी २००० साली महापालिकेत धाव घेतली आणि या बिल्डिंगला ओसीच नसल्याचं समोर आलं. २००५ साली कॅम्पाकोलाचे मजले अनधिकृत असल्याचं लक्षात आलं आणि रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.