उत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?

राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 19, 2013, 04:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`झी मीडिया`च्या दणक्यानंतर राज्य सरकारला जाग आलीय. उत्तराखंडमध्ये तिर्थयात्रेसाठी गेलेल्या राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
उत्तराखंड जलप्रलयाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री मंडळाची तातडीची बैठक आज झाली. या बैठकीनंतर पुरात अडकलेल्या नागरिकांना वैद्यकिय मदत आणि अन्नाचा पुरवठा करणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय. राज्यातले एकूण १३५३ भाविक पुरात अडकल्याची माहिती आहे. त्यातील ३३४ यात्रेकरूंशी अद्यापही संपर्क झालेला नाही. या जलप्रलयात अडकलेल्या भाविकांना विशेष विमानातून महाराष्ट्रात आणणार असल्याचीही माहिती राज्य शासनानं दिलीय.

नाशिकच्या ७० पर्यटकांची सुखरुप सुटका
दरम्यान, नाशिकच्या सत्तर पर्यटकांची सुखरुप सुटका झालीय. पाऊस ओसरल्यानं त्यांना सुखरुप ठिकाणी पोहोचता आलंय. तर उरलेल्या पर्यटकांसाठी राज्यातून गेलेल्या मदत पथकाचं काम सुरू झालंय. महाराष्ट्रातले सगळे पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे. ‘झी २४ तास’नं केलेल्या पाठपुराव्यानंतर, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातून राज्यातल्या पर्यटकांच्या मदतीसाठी एक विशेष पथक रवाना झालंय. महाराष्ट्र सदनाचे अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या अधिपत्यखाली हे पथक पाठविण्यात आलंय. डेहराडूनमध्ये मदत केंद्रही सुरु करण्यात येणार आहे.
इतर राज्यात सहलीसाठी किंवा फिरायला जाण्यापूर्वी संबंधित राज्यातल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधूनच पुढच्या प्रवासाची दिशा ठरवावी, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. यासाठी राज्य सरकारनं एक हेल्पलाईनही सुरु केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.