बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीची रंग दाखवायला सुरुवात

भाजपाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने आता रंग दाखवायला सुरूवात केलीय. विधान परिषदेचं सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. काँग्रेसच्या ताब्यातला एकमेव लाल दिवा काढून घेण्याची राष्ट्रवादीची ही खेळी यशस्वी होईल का?

Updated: Nov 14, 2014, 02:24 PM IST
बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीची रंग दाखवायला सुरुवात title=

मुंबई : भाजपाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने आता रंग दाखवायला सुरूवात केलीय. विधान परिषदेचं सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. काँग्रेसच्या ताब्यातला एकमेव लाल दिवा काढून घेण्याची राष्ट्रवादीची ही खेळी यशस्वी होईल का?

काल-परवापर्यंत सत्तेत पार्टनर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध प्रचंड ताणले गेलेत. एकीकडे काँग्रेसने सरकारच्या विरोधात दंड थोपटलेत, तर दुसरीकडे भाजप सरकारला मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतलीय. आता काँग्रेसला आणखी अडचणीत आणण्याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जाणार आहे. विधान परिषदेचे सभापतीपद सध्या काँग्रेसकडे असून शिवाजीराव देशमुख हे सभापती आहेत. १५ वर्षांची सत्ता गेल्यानंतर काँग्रेसकडे सभापतीपदाच्या रुपाने एकमेव लाल दिवा शिल्लक आहे. हा लाल दिवाही काढून आपल्याकडे घेण्याची खेळी आता राष्ट्रवादी खेळणार आहे.

विधान परिषदेतील आमदारांची एकूण संख्या ७८ आहे.
त्यात राष्ट्रवादी काँग्रेस – २७
काँग्रेस – २१
भाजपा – ९
शिवसेना – ६
लोकभारती – १
शेकाप - १ आणि
इतर – ८ असं संख्याबळ आहे.

विधान परिषदेत राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असल्यानं आता सभापतीपदावर दावा सांगण्याची तयारी राष्ट्रवादीने केलीय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी राष्ट्रवादीनं सुरू केलीय. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाची मदत घेणार आहे. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी राष्ट्रवादीची साथ घेणारा भाजप विधान परिषदेत सभापतीपदासाठी राष्ट्रवादीला मदत करेल अशी शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र असताना त्यांच्या पदांची वाटणी झाली होती. या पदांच्या वाटणीत विधानपरिषदेचे सभापतीपद काँग्रेसकडे गेले होते. आता, मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे एकमेकांना अडचणीत आणण्याचं काम हे दोन्ही पक्ष करणार... त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेससकडील सभापतीपद खेचून घेण्याची तयारी सुरू केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.