'फोर जी' गिळंतय मुंबईकरांची मैदानं; नागरिकांचा विरोध!

शहरात आता 'फोर जी' टॉवर्सचा मुद्दा पेटणार आहे. मुंबईकरांना एकतर खेळायला मैदानं उरलेली नाहीत. त्यातच आता असलेल्या मैदानांवर ४जी टॉवर्स उभारून मैदानांचाच घास घेतला जातोय. चेंबूरमधल्या नागरिकांना याविरोधात काल एल्गार केला. त्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. 

Updated: Feb 24, 2015, 04:02 PM IST
'फोर जी' गिळंतय मुंबईकरांची मैदानं; नागरिकांचा विरोध! title=

मुंबई : शहरात आता 'फोर जी' टॉवर्सचा मुद्दा पेटणार आहे. मुंबईकरांना एकतर खेळायला मैदानं उरलेली नाहीत. त्यातच आता असलेल्या मैदानांवर ४जी टॉवर्स उभारून मैदानांचाच घास घेतला जातोय. चेंबूरमधल्या नागरिकांना याविरोधात काल एल्गार केला. त्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. 

चेंबूरच्या सह्याद्री मैदानावर रोज खेळणारे छोटे क्रिकेटपटू हातात बॅच बॉल घेण्याऐवजी फलक घेऊन मैदानात उतरलेले दिसतायत. मैदानात मुलांचं आंदोलन तर मैदानाच्या दुतर्फा त्याच भागातले नागरिकही रस्त्यावर उतरलेत. मैदान वाचवण्यासाठी एरवी शांतताप्रिय असलेल्या मुलांना, नागरिकांना आक्रमक व्हावं लागलंय. मुंबईत सध्या ४जी टॉवर्स उभारण्याचं काम सुरू आहे. त्यापैंकीच एक टॉवर टिळकनगर भागातल्या या सह्याद्री मैदानात होणार आहे. मैदानाचा घास घेतला जाणार असल्यानं नागरिक संतप्त झालेत.

मुलांचं खेळण्याचं मैदान हिरावलं जाणार आहेच. त्याचबरोबर या भागात नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. मोबाईल टॉवर्समुळे होत असलेल्या रेडिएशनचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आक्षेप घेतला जातो.. त्यातच आता हे फोर जी टॉवर्स येत आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे, सार्वजनिक मैदानांवरच हे टॉवर्स कसे काय उभारले जातात असाही आक्षेप नागरिकांनी घेतलाय. 

नागरिक रस्त्यावर उतरले की राजकीय पक्षही त्यांचा कळवळा घेत रस्त्यावर उतरतात. मात्र, राजकीय पक्षांचा हा कावा न समजण्याएवढी जनता दूधखुळी नाही.. मुंबईभर हे टॉवर्स उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेत आला तेव्हा आता रस्त्यावर येणारे राजकीय पक्ष काय झोपले होते का असा सवाल विचारला जात आहे. मुळातच... 

१) महापालिका या यंत्रणेनं नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं अपेक्षित असतं, या टॉवर्सना मंजुरी देताना महापालिकेनं आरोग्याचा विचार केला का ? 
 
२) मोठ्या उद्योगसमूहांना अशा प्रकारची मंजुरी चुटकीसरशी कशी मिळते ?
 
३) मोठ्या उद्योगसमूहांच्या प्रस्तावांना विरोध न करण्यामागे सगळ्याच राजकीय पक्षांचं काय हित असतं ?
 
हे प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडले आहेत. मुंबईत मोकळ्या जागा फारशा उरलेल्या नाहीत. त्यातच जी मैदानं आहेत त्यांचाही असा घास घेण्याचा डाव प्रशासन करत असेल तर मुंबईकर तो यशस्वी होऊ देणार नाहीत. विकासाला विरोध असायचं कारण नाही. पण सर्वसामान्य मुंबईकराच्या जीवावर विकासाचं घोडं उधळलं जाणार असेल तर त्याला नागरिकांना ते कसं मान्य होईल? 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.