झी २४ तास वेब टीम, मुंबई
अण्णांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत माझ्यावर अविश्वास दाखवल्यामुळे मी नाराज झाल्याची प्रतिक्रिया लेखक, पत्रकार राजू परुळेकर यांनी ब्लॉगवर व्यक्त केल्याचे समजते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीत राजघाटावर मौन सोडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी राजूने स्वत:च्या मनाने काही लिहले आहे का, याची चौकशी करतो, असे बोलून परुळेकर यांच्यावर अविश्वास दाखवला होता.
एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भात ही माहिती दिली आहे. मी अण्णा हजारे यांचेच विचार त्यांच्या ब्लॉगद्वारे मांडले आहेत. माझ्या मनाचे काहीही त्यात लिहिलेले नाही, असे परुळेकर यांनी स्पष्ट केले आहे. मला अण्णांनी जे लिहून दिले तेच मी मांडले आहे. या विषयी शंका असल्यास माझ्याकडे असलेले पुरावे मी सादर करतो, असे त्यांनी सांगितले आहे.
कोअर कमिटीत बदल करण्याचा अण्णांचा विचार सुरू होता. तसे त्यांनी पत्रात लिहून दिले होते. पण त्यांचे सहकारी सुरेश पाठारे यांनी ते पत्र प्रसिद्ध करू नये असे सांगितले होते, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.
दरम्यान, टीम अण्णांना याबद्दल विचारले असता या पत्राबद्दल अण्णा लवकरच खुलासा करतील असे सांगण्यात आले आहे.