www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुखांकडून सेना आमदारांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. बाळासाहेब आमदारांच्या कामगिरीवर नाराज झाले आहेत. 'शिवसेना आमदारांनो 'आक्रमक होता येत नसेल तर राजीनामा द्या' अशा शब्दात बाळासाहेबांनी आमदारांना झो़डपून काढलं.
शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना आमदारांच्या कामाच्या शैलीवरच आक्षेप घेतला आहे. तुमच्याकडून कामं होत नसतील तर 'मी दुस-यांना संधी देतो' असं म्हणत बाळासाहेबांनी ठाकरी प्रहारच आमदारांवर केला आहे. शिवसेना म्हणजे आक्रमक, फक्त एक आदेश आणि तोच पुरेसा.... अशी शिवसेनेची आणि शिवसेनाप्रमुखांची दहशत होती.
मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या वयोमानानुसार त्याची धारही कमी कमी होत गेली. त्यामुळेच राज्यातही शिवसेनेला म्हणावं तसं यश मिळत नाही. राज्यात दुष्काळ, पाणी टंचाई, मंत्रालय आग आणि इतरही महत्त्वाचे विषय असून सुद्धा विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकले नाहीत. आणि या साऱ्यामुळेच बाळासाहेबांच्या संतापाचा कडेलोट झाला. बाळासाहेबांनी आमदारांना हा इशारा दिल्याचे शिवसेनेतल्या खात्रीलायक सूत्रांकडून समजते.