शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे मनसेत यायला उत्सुक होते, या मनसे आमदार राम कदम यांच्या गौप्यस्फोटाला राज ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.
राम कदमांविरोधात आनंद परांजपे कोर्टात गेल्यास, पोलिसांची साक्ष काढू असं सांगत, राज ठाकरेंनी परांजपेंची कोंडी केलीय.
कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांच्याबाबत मनसे आमदार राम कदम यांनी 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या कार्यक्रमात केलेल्या या गौप्यस्फोटानं खळबळ उडाली नसती तरच नवल. यावर तातडीनं प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार आनंद परांजपे यांनी हे विधान मागं घेण्याचं आवाहन राम कदमांना केलं.
परांजपेंनी कोर्टात खेचण्याचा इशारा दिला खरा, पण राज ठाकरेंनी पोलिसांची साक्ष काढू असं सांगत शिवसेनेतला संशयकल्लोळ वाढवला.
असं विधान करत राज ठाकरेंनी आनंद परांजपेंनाच अडचणीत आणलंय. परांजपे यांनी दिलेला कायदेशीर कारवाईचा ईशारा आणि खुद्द राज ठाकरेंनी दिलेला दुजोरा यामुळं हा वाद इथेच संपणार नाही हे स्पष्ट झालंय.