गरीबांनी पछाडले जंग जंग, हिरानंदानीचे टॉवर टोलेजंग

हिरानंदानी बिल्डर्सने गरीबांसाठी मिळालेल्या जागेत टोलेजंग टॉवर्स बांधले असल्याने गरीबांनी हिरानंदानी बिल्डर्सविरुद्ध मोर्चा काढला आहे. राज्य सरकारने ४० पैसे प्रति एकर दराने गरीबांसाठी दिलेली २३० एकर जमीन हिरानंदानी बिल्डर्सने लाटली असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे.

Updated: Jul 4, 2012, 05:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

हिरानंदानी बिल्डर्सने गरीबांसाठी मिळालेल्या जागेत टोलेजंग टॉवर्स बांधले असल्याने गरीबांनी हिरानंदानी बिल्डर्सविरुद्ध मोर्चा काढला आहे.  राज्य सरकारने ४० पैसे प्रति एकर दराने गरीबांसाठी दिलेली २३० एकर जमीन हिरानंदानी बिल्डर्सने लाटली असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे.

१९८९ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना एरिया डेव्हलपमेंट स्कीममध्ये गरीबांसाठी घरांचा प्रकल्प उभारावा म्हणून हिरानंदानी बिल्डर्सला २३० एकर जमीन केवळ ९२ रुपयांमध्ये देण्यात आली होतं. खरंतर या स्कीमनुसार हिरानंदानी बिल्डर्सने गरिबांना ४०० स्क्वेअर फुटांची ३ हजार घरं ५४ हजार रूपयांत देणं आवश्यक होतं. पण  गरीबांना अजून यातील एकही घर मिळालेलं नाही.

हिरानंदानी बिल्डर्सने गरीबांसाठी असलेल्या जागेवर टोलेजंग टॉवर्स उभारुन गरीबांसाठी असलेली जमीन लाटली. या पार्श्वभूमीवर आज कांजूरमार्ग ते पवई या भागात हिरानंदानी बिल्डर्सविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. आपली घरं मिळावीत अशी मागणी करत या गरीबांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाचं नेतृत्व मिलिंद रानडे यांनी केलं.

१९८९ ते २०१२ या काळात पवारांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र हिरानंदानी बिल्डर्सवर कारवाई करण्याचं धाडस अद्याप कोणीही केलेलं नाही. त्यामुळे चिडलेल्या गरीबांना घरांसाठी मोर्चा काढला आहे.