www.24taas.com, मुंबई
'उद्या गल्लीबोळातही टोलनाका सुरू करतील हे लोक, 'उद्यापासून मनसेचे कार्यकर्ते हे टोलनाक्यावर उभे राहतील गाड्या मोजतील', 'पण माझ्या या कार्यकर्त्यांना टोलनाक्यावरील लोकांनी काही व्यत्यय आणला तर यांचे परिणाम वाईट होतील' , 'माझी लोकं शांततेत काम करतील त्यांना त्रास दिला तर लक्षात ठेवा', 'त्यानंतर मात्र महाराष्ट्रात असा हंगामा उभा करीन तो कोणालाही रोखता येणार नाही', असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील वसूलीबाबत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आज त्यांच्या निवास्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विरोधीपक्षावरही केली टीका
'विरोधीपक्षाला सरकारने टाकलंय खिशात, आणि हे विरोधी पक्षाचे लोकही काही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसलेत , विरोधक आपआपले टक्के घेऊन, तंगड्या वर करून झोपले आहेत, महाराष्ट्र भोगतोय, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. 'भुजबळांनी मला शिकवू नये कसे राज्य चालवावं', 'राज्य कसं चालवावं हे मला चागलंच माहिती आहे', 'टोलनाका बहुतेक भुजबळांची रोजीरोटी आहे वाटतं'. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भुजबळांच्या टीकेला राज यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. टोलनाक्यावरील वसूलीत करोडो रूपये रोज मिळतात, आजवर टोल नाक्याची वसूली केली गेली त्यात यांचा बांधकाम खर्च निघाला नाही का, टोल वसूली करून जनतेची फसवणूक होते आहे, रस्त्यांच्या दुरावस्थेला कंत्राटदार, PWD हे लोक जबाबदार आहेत. असं म्हणतं राज ठाकरे यांनी रस्त्या्च्या दुरावस्थेबद्दल भाष्य़ केलं
मनसे स्टाईल आंदोलन
मुबंई-पुणे महामार्गावरील कामकाज हे योग्य केलेलं नाही, मी टोल घेण्याचा विरोधात नाही, टोल वसुलीबाबत खोटारडेपणा होत आहे, राज्यसरकारला टोलनाके सुरू करायचे असेल तर सुरू करू शकतात , पण यापुढे प्रत्येक टोलनाक्यावर मनसेचे ५० लोक उभे राहतील, प्रत्येक गाडीची आणि मिळणाऱ्या पैशाची मनसे मोजदाद करील, सोमवार पासून पुढील १५ दिवस टोलनाक्यावरील पैशाची मोजदाद करून किती आकडा होतो हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट करण्यात येईल, असं म्हणतं मनसे आता वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रपतीपदाच्य़ा निवडणुकीवर राज यांची टीका
राष्ट्रपतीपदाच्य़ा निवडणुकीवरही राज यांनी टीका केली आहे. राष्ट्रपतीपद म्हणजे रबर स्टॅम्प आहे, राष्ट्रपतीपदावर जर सरकारमधले लोकच बसणार असतील तर त्याला काहीही अर्थ नाही, राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकित मी कोणाही सोबत नसेन.