भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच नहीत!

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.

Updated: Jan 14, 2012, 07:13 PM IST

प्रियंका वानखेडे, www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि भेसळ विभाग म्हणजेच FDA मध्ये कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे भेसळखोरांवर कारवाईसाठी कर्मचारीच कमी पडत आहेत. FDA मध्ये तब्बल १७२ पदं रिकामी असल्याचं समोर आलं आहे.

 

१२ ऑक्टोबर २०११ रोजी मुंबईतल्या बांद्रा परिसरात ४ हजार किलो नकली मावा जप्त झाला होता. २१ ऑक्टोबर २०११ ला प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने दूधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. अन्नधान्य असो वा औषधं, भेसळखोरांवर करडी नजर ठेवण्याचं काम FDA चे कर्मचारी करत असतात. मात्र, राज्य सरकारच्या FDAमध्ये कर्मचाऱ्यांची तीव्र वानवा जाणवत आहे. FDA मध्ये तब्बल थोडीथोडकी नाहीतर १७२ कर्मचाऱ्यांची पदं रिकामी असल्याचं माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत उघड झालं आहे

 

या रिकाम्या पदांमध्ये फक्त कनिष्ठ कर्मचारीच नाही, तर ३ असोसिएट कमिशनर, १४ असिस्टंट कमिशनर, तसंच ४ संशोधकांच्याही जागाही रिकाम्याच आहेत. १९९६ नंतर इथे जागाच भरल्या नसल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वाचा परिणाम कामकाजावर होतो. एकीकडे भेसळखोर मोकाट सुटलेत, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची वानवा अशा चक्रात सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जात आहे, निवडणुकीच्या धामधुमीत सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.