रेल्वे डोक्यावरून गेली, तरी मुलगी बचावली

रेल्वे खाली जीव देण्याच्या उद्देशाने एका आईने आपल्या मुलीसकट रेल्वेखाली झोकून दिलं, मात्र लोकलखाली कोणीतरी सापडल्याचे लक्षात येताच मोटरमनने ‘इमरजन्सी’ ब्रेक लावला. पण बारा डब्यांची गाडी डोक्यावरून गेली आणि तरीही नऊ वर्षांची ती चिमुरडी आश्‍चर्यकारकरीत्या बचावली.

Updated: Jul 19, 2012, 02:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रेल्वे खाली जीव देण्याच्या उद्देशाने एका आईने आपल्या मुलीसकट रेल्वेखाली झोकून दिलं, मात्र लोकलखाली कोणीतरी सापडल्याचे लक्षात येताच मोटरमनने ‘इमर्जन्सी’ ब्रेक लावला. पण बारा डब्यांची गाडी डोक्यावरून गेली आणि तरीही नऊ वर्षांची ती चिमुरडी आश्‍चर्यकारकरीत्या बचावली.

 

मात्र तिची आई जागीच ठार झाली. जखमी अवस्थेतही मुलगी जिवंत असल्याचे लक्षात येताच ड्युटीवर हजर होण्यासाठी निघालेल्या रेल्वे गार्डने ट्रॅकवर उडी घेतली. रक्ताळलेल्या आणि भेदरलेल्या मुलीला त्याने उचलले व धावपळ करीत वांद्रे स्थानकातील स्टेशन मास्तर कार्यालयात पोहोचवले आणि १५ मिनिटांत ती भाभा रुग्णालयात दाखल झाली. डोक्यावर गंभीर इजा झाली असली तरी ती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

गार्ड चेतन परमार यांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे या चिमुरडीला जीवदान मिळाले. खार-वांद्रे दरम्यान रेल्वे फाटकाजवळ दुपारी २ वा. ही घटना घडली. रसीला कीर्तीकुमार रावल (३६) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून विनल (९) हे जखमी मुलीचे नाव आहे. सरस्वती कुटीर चाळ, जवाहर नगर, खार येथे त्या राहतात. चर्चगेटकडे जाणार्‍या फास्ट लोकलखाली रसीला आपल्या मुलीसह झोकून दिल्याचं रेल्वे कर्मचार्‍यांनी सांगितले.