www.24taas.com, झी मीडिया, अकोला
लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.
अकोल्यातील प्रख्यात `सर्जन` डॉ. सुनील मापारी यांच्याकडे नुकतीच एक `अनोखी` केस आली. बुलडाणा जिल्ह्यातील राहुल नावाच्या बावीस वर्षीय तरुणाला डॉ. मापारी यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. रुग्ण पोटदुखीने त्रस्त होता. `एक्स-रे` पाहिल्यानंतर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण राहुलच्या पोटात डॉक्टरांना चक्क आढळले नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी. ब्लेड जठरात अडकलेलं असल्यानं ही शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती. पण, डॉ. मापारी आणि त्यांच्या चमूने हे आव्हान स्वीकारत ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडलीये.
रुग्णानं ताण-तणावातून गेल्या वीस दिवसांपासून या वस्तू गिळल्या होत्या. यासंदर्भात त्याच्या घरच्या मंडळींना काहीच ठावूक नव्हतं. शस्त्रक्रियेनंतर राहुलची प्रकृती ठणठणीत असून लवकरच तो आता गावी परतणार आहे. मात्र पुन्हा अशी चूक करणार नसल्याचं सांगत त्यानं कान धरले.
सध्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणावामुळे अनेकदा रागावर नियंत्रण ठेवणं अशक्य होतंय. त्यातूनच राहुलसारखे उदाहरण घडतंय. त्यासाठी वेळेवर तज्ज्ञांचं समुपदेशन घेणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.