www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय. तर 106 जणांचा बळी गेलाय.
या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा दौरा केला होता. त्यानंतर आता आज मदत जाहीर करण्यात आलीय. मात्र नेमकी मदत कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय. विरोधकांचं मात्र या मदतीवर समाधान झालेलं नाही.
33 हजारांपेक्षा अधिक घरांचं अतिवृष्टीमुळे नुकसान
4 लाख 961 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान
मृतांच्या वारसदारांना 2.5 लाखांची मदत
अशत: नुकसान झालेल्या घरांना 15 हजारांची मदत
खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 20 हजार नुकसान भरपाई
संपूर्ण वाहून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 25 हजार मदत
नुकसानग्रस्त 502 पुलांच्या दुरुस्तीसाठी 141 कोटी
36 इमारतींच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी
पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी 5 कोटी
विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती 5 कोटी
मालगुजारी तलावाची विशेष दुरुस्ती- 50 कोटी
सिमेंट नाला बांधणी 170 कोटी
संपूर्ण विदर्भात पावसानं कहर केलाय. चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीये. इरई धरणाची सर्व ७ दारे १.५ मीटरने उघडण्यात आली असून शहर आणि जिल्ह्यातील वर्धा, इरई, झरपट या नद्यांच्या मार्गावर असलेली गावं आणि वस्त्यांध्ये पुराचं पाणी शिरून मोठं नुकसान झालंय. मूल शहरात झोपडी कोसळून सलोनी ठीकरे या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, तर दोन जण गंभीर जखमी झालेत. जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद झालेत.
यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालंय. पैनगंगा, अडान नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. त्यातच इसापूर, अरुणावती आणि आदान या मोठ्या धरणांचे दरवाजे उघडल्याने परिस्थिती गंभीर आहे. नागपूर-बोरी तुळजापूर हा राज्य मार्ग बंद पडल्यानं विदर्भाचा मराठवाड्याशी संपर्क तुटलाय. प्राथमिक अंदाजानुसार 50 हजार हेक्टर शेतीचं अतोनात नुकसान झालंय.
नागपूरमध्येही दिवसभरात 101 मि.मी पावसाची नोंद झालीये. अनेक भागात पाणी साचलंय. पुरामुळे 1 जण वाहून गेलाय. अंबाझरी आणि सोनेगाव तलाव भरून वाहतायेत. अमरावती जिल्ह्यातही गेल्या 36 तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्यांना पूर आलाय. संततधार पावसामुळे मूग, सोयाबीन, तूर, कपाशीचं नुकसान झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.