एक फोन फिरवला... अन् झाली नगराध्यक्षांची निवड

येवला तालुका म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला, तालुक्यातील सत्ताकेंद्र भुजबळांच्या ताब्यात आहे. म्हणूनच भुजबळ म्हणतील तोच उमेदवार पदावर असतो. येवल्यामध्ये नुकत्याच नवीन नगराध्यक्षांची निवड झालीय आणि तीही फोनवरून.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 22, 2012, 08:29 PM IST

www.24taas.com, येवला
येवला तालुका म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला, तालुक्यातील सत्ताकेंद्र भुजबळांच्या ताब्यात आहे. म्हणूनच भुजबळ म्हणतील तोच उमेदवार पदावर असतो. येवल्यामध्ये नुकत्याच नवीन नगराध्यक्षांची निवड झालीय आणि तीही फोनवरून.
एकहाती सत्ता असल्यास आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राजकारणातील तत्परता कशी दाखवता येते, हे भुजबळ यांनी नुकतचं दाखवून दिलंय. येवला नगरपरिषदेच्या नगरध्यांक्षांच्या निवडणुकीवेळीच, शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीतील बिघाडामुळे भुजबळांचा येवला दौरा रद्द झाला. मात्र, येवल्यातील नगरसेवकांना उत्कंठा लागली होती ती भुजबळांच्या फोनची. कारण नगराध्यक्षपदावर कोणाची निवड होणार, हे भुजबळ फोनवरून जाहीर करणार होते. पालिकेतील सर्वच नगरसेवकांची मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी जाणून घेतली आणि भुजबळांना फोन लावला. भुजबळांनी फोनच्या स्पिकरवरून नगरसेवक निलेश पटेल यांच्या नावाची घोषणा केली आणि पटेल यांना फोनवरूनच नगराध्यक्षपदाची लॉटरी जाहीर झाली.
शहराच्या विकासासाठी भुजबळांनी पटेल यांच्या माध्यमातून युवा नेतृत्वाला संधी दिली आहे, तसचं निलेश पटेल यांच्या रुपाने ४५ वर्षांनंतर गुजराती समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे.