www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंत्रमानवाप्रमाणं भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धांगवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
ब्राझीलचे डॉ. मिग्युएल निकोलिस यांच्या नेतृत्वाखालील जगातील १५६ वैद्यकतज्ज्ञांनी या पोशाखाची निर्मिती केली आहे. गुरुवारी साओ पावलो इथं होणाऱ्या फिफा वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात पक्षाघातातून सावरू पाहणारी ही व्यक्ती चाकांच्या खुर्चीवरून नव्हे, तर खास पोलादी पोशाख परिधान करून या स्पर्धेतील पहिली किक मारणार आहे. या व्यक्तीची ओळख गुप्त राखण्यात आली आहे.
"या पोशाखाच्या पायांवर इलेक्ट्रॉनिक सर्किट्सची रचना करण्यात आली असून, त्यांचे संकेत मेंदूला पाठवले जातील. एखाद्या स्टेडियममध्ये अशी करामत साकारणं, हे आमच्यापुढील नवं आव्हान होतं," अशी माहिती डय़ूक विद्यापीठाचे मेंदूशास्त्रज्ञ निकोलिस यांनी दिली. निकोलिस यांनी १९८४मध्ये डॉक्टरकी मिळवण्यासाठी सादर केलेल्या प्रबंधात हा अभ्यास सुरू केला होता. २००२मध्ये अशा प्रकारच्या पोशाखाची निर्मिती करण्याचं त्यांनी निश्चित केलं.
ते पुढे म्हणाले, "२००९मध्ये ब्राझील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद सांभाळणार असल्याचं मला कळवण्यात आलं. ब्राझीलचं वेगळेपण आपल्याला प्रत्येक कार्यक्रमातून दाखवायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. फुटबॉलवर आधारित हीच मानवी क्षमता दाखवून देण्याचं मग मी ठरवलं." निकोलिस यांनी या पोशाखी यंत्राचं नाव `ब्रा-सांतोस डय़ुमाँ` असं ठरवलंय.यापैकी पहिली अक्षरे ब्राझील या देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि अल्बेतरे सांतोस-डय़ुमाँ हा या देशातील विमान संशोधक.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.