राफेल नदालच फ्रेंच ओपनचा बादशहा, नदालचं 9वं फ्रेंच ओपन!

फ्रेंच ओपनचा बादशहा कोण....तर राफेल नदाल...हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं. जेव्हा राफानं ज्योकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 9, 2014, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस
फ्रेंच ओपनचा बादशहा कोण....तर राफेल नदाल...हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं. जेव्हा राफानं ज्योकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.
फ्रेंच ओपनवरची लाल माती.....त्यावर लढणारे हे दोन लढवय्ये खेळाडू. अग्रमानांकित राफेल नदाल आणि द्वितीय नोव्हाक ज्योकोविच. सध्याच्या टेनिस जगतातील सगळ्यात लोकप्रिय.... आणि तितकीच पैसा वसूल रायव्हलरी... त्यामुळे रविवारच्या मॅचसाठीचा सस्पेन्स चांगलाच तयार झाला होता. दोघांमधला हा तब्बल 42वा सामना. त्यात राफा 22-19 असा थोडासाचा आघाडीवर. त्यामुळे यंदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोण कोरणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती.
इतिहास कोण निर्माण करणार.... राफा का नोव्हाक? अर्थात विजयाबरोबर नंबर वनचा किताबही पणाला लागला होता. अतिशय उष्ण वातावरणात सुरु झालेल्या या सामन्यात ज्योकोविचने धडाक्यात सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. बॅकहँड आणि ग्राऊंड कव्हरेजमुळे पाहता पाहता हा सेट नोव्हाकने 6-3 असा खिशात टाकला. काही तरी वेगळं घडणार असं वाटत असतानाच राफाने दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ उंचावला. पण नोव्हाकही त्याला जशास तसे उत्तर देत होता. 6-5 असा आघाडीवर असताना नोव्हाकची सर्व्हिस भेदत राफाने हा सेट 7-5 असा जिंकत मॅच बरोबरीत आणली.
तिसऱ्या सेटमध्ये मात्र राफाने आपल्या ताकदवान फोरहँडचा ताबडतोड वापर करत नोव्हाकला निष्रभ केलं. डबल ब्रेक मिळवत राफाने हा सेट 6-2 असा जिंकला.
वातावरणातील तणाव आणि वाढती उष्णता यामुळे ज्योकोविच नदालच्या फिटनेस आणि चपळतेची बरोबरी करु शकतो का अशी शंका टेनिसप्रेमींच्या मनात यायला लागली. पण थकेल तो नोव्हाक कसला. त्याने आपला प्रतिकार सुरुच ठेवला. पण राफानेही खेळाची लय आणि रिदम कायम ठेवत. नोव्हाकला खेळवत ठेवलं. अखेर तब्बल 3 तास 30 मिनिटांनंतर ज्योकोविचच्या डबल फॉल्टमुळे राफाला मिळालं त्याचं 9वं फ्रेंच ओपन. आनंदामुळे जमिनीवर कोसळलेल्या राफासाठी आभाळ ठेंगणं झालं होतं.
2012च्या फायनलमध्ये अशाच पद्धतीने डबल फॉल्टमुळे नोव्हाक हरला होता. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा भूतकाळाची उजळणी झाली आणि निकाल तोच ठरला. फ्रेंच ओपनचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदाल. हे राफाचं सलग पाचवं तर एकूणातील नववं फ्रेंच ओपन. यामुळं 14वं ग्रँडस्लॅम मिळवत राफाने. ग्रेट पीट सॅम्प्रासची बरोबरी केलीय. आता 17 ग्रँडस्लॅम्स सह त्याच्या पुढे फक्त फेडरर आहे.
ट्रॉफी सेरेमनीमध्ये दोन्ही प्लेयर्सना अश्रू आवरत नव्हते. कारण प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे आणि देत राहतील. पण शेवटी पॅरिसची लाल माती ओळखली जाईल. ती केवळ राफेल नदाल या नावाबरोबर. किंग ऑफ क्ले... व्हामोस राफा!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.