मनसेचं पुढील स्टेशन 'पुणे'

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आहे. २९ जागांवर विजय मिळवत मनसेनं आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवातही केली आहे.

Updated: Feb 22, 2012, 03:53 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आहे. २९ जागांवर विजय मिळवत मनसेनं आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवातही केली आहे. पण असं असलं तरी अजितदादांना आव्हान देत पुण्यात विजय मिळवणं हे भविष्यातही तेवढंच आव्हानात्मक असणार आहे.

 

मुंबई - नाशिक वर आपलं लक्ष केद्रींत करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी पुणे हा देखील एक भरघोस मताधिक्य देणारा मतदारसंघ ठरला आहे. खरंतर पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचं होम ग्राऊंड. जनसंघाची साथ धरुन भाजपनही आपली जागा निर्माण केली. त्यातच शिवसेनेनंही मराठीचा नारा देत पुण्यात आपलं स्थान निर्माण केलं.

 

या साऱ्या प्रस्थापिताना धक्का देत मनसेनं आपलीही वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे.  यावेळी मनसेला दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे पाच लाख ३३ हजार मते मिळाली. मनसेच्या या यशाने मनसेच्या कार्यकर्त्याचाही उत्साह आता चांगलाच दुणावला आहे. आता या सर्वानांच २०१४ चे वेध लागले आहेत. पुण्यातला या यशाने कार्यकर्त्याचीच नव्हे तर राजकिय विश्लेषकांनीही मनसेच्या पदरात माप टाकलं आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत मनसेला यश मिळेल पण साभांळूनच राहावं लागेल असा सल्लाही काहीजण देत आहेत.

 

राजकिय विश्लेषकाप्रमाणेच पुण्यातला सत्तेचा प्रमुख दावेदार असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मनसेही सत्तेचा दावेदार असल्याच अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. या वेळेला दुसऱ्या क्रमाकांची मतं देत पुणेकरांनी मनसेवर विश्वास टाकला आहे. आता मनसेनं या विश्वासाचं सोनं केल तरच खऱ्या अर्थानं २०१४ ला पुण्यात विधानसभेसाठी एकहाती सत्तेची स्वप्न पाहणं योग्य ठरेल.