www.24taas.com झी मीडीया, मुंबई
पिंपरी-चिंचवडमध्ये सतत होणारा पाऊस पाहता, शहराला पुराचा धोका आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना नदीकाठी सर्रास बांधकामं सुरू आहेत आणि तीही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादानं. उत्तराखंडचं उदाहरण ताजं असताना सत्ताधा-यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही.
पवना, इंद्रायणी आणि मुठा या तीन नद्यांनी पिंपरी शहराचं सौंदर्य खुलवलंय. पण सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये धो धो पाऊस सुरू असल्यानं या नद्यांना जास्तच जोर आलाय. परिणामी पवना धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे थेरगावमधला काही परिसर पाण्याखाली गेलाय. पावसाचा जोर कायम राहिला तर शहराला पुराचा धोका आहे. पवनेचा इतिहास पाहता दर दहा वर्षांनी शहराला पुराचा फटका बसलाय. १९४४, १९५८, १९७६, १९८५ आणि २००५ मध्ये पवनेला पूर आला होता. यंदा पावसाचा जोर पाहता, याहीवर्षी पुराची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यातच नदीकाठी सर्रास झोपडपट्या बांधल्या जात आहेत, भराव टाकला जातोय. आणि याकडे दुर्लक्ष केलं जातंय.
एकीकडे पुराचा धोका असताना राजकीय पक्ष त्याकडे दुर्लक्ष करतायत. हे कमी होत की काय म्हणून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसनं बहुमताच्या जोरावर पूररेषा बदलत आणखी दीड मीटर परिसरात बांधकाम करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली होणा-या या बांधकामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय.
नदीकाठाशी छेडछाड करुन बांधकाम केलं की काय होतं, हे उत्तराखंडनं दाखवून दिलंय. तरी पैशाच्या हव्यासापायी आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेलं हे बांधकाम एक दिवस धोक्यात येणार, हे नक्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.