www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, शंभरीतही तरुणाईला लाजवणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचे शुक्रवारी पुण्यात प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 99 वर्षाचे होते.
समाजासाठी अहोरात्र झटणा-या दाजीकाकांनी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवून पुण्यातल्या सराफांना एकत्र आणलं. त्यांच्यातल्या अपप्रवृत्ती त्यांनी दूर केल्या. लातूर भूकंपग्रस्तांसाठी निधी उभारला.
लक्ष्मी रोडवरच्या पे-अँड पार्क कायद्याला त्यांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था त्याचंच फलित आहे. अनेक सेवाभावी संस्थांशी त्यांचा संबंध आला. अडचण असणा-यांना ते सढळ हस्ते मदत करत असत.
मूळचे कोकणातील मालवणमधील त्रिंबक गावचे हे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीत स्थिरावले.
सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत २९ नोव्हेंबर १९३२ रोजी `गणेश नारायण गाडगीळ सराफ व ज्युवेलर्स’ या दुकानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर सन १९५८च्या सुरुवातीला पुण्यात `मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ (पीएनजी) या नावाने दुकान काढण्याचा धाडसी निर्णय दाजीकाकांनी घेतला आणि सचोटी व मालातील चोखपणा या गुणांमुळे चोखंदळ पुणेकरांनी यशाची माळ गाडगीळांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर गाडगीळांनी ९७ मध्ये लक्ष्मी रोडवरच्या दुकानात हिरे व इतर रत्नांचा विभाग सुरू केला.
पौड रोडला सोने-चांदी आणि हिरे-मोती विक्रीची दोन दुकाने, तसेच चिंचवड आणि कॅम्प विभागात शाखा उघडून चौफेर घोडदौड सुरू केली. दुकानाच्या उद्घाटनाला प्रीती झिंटा, लता मंगेशकर यांना बोलावले, पीएनजीची पहिली ब्रँड ऍम्बॅसिडर म्हणून लोकप्रिय अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांना नेमले होते.
दाजीकाकांवर कालनिर्णय, पुणे महापालिकेतर्फे सत्कार, रोटरी एक्सलन्स ऍवॉर्ड अशा अनेक सन्मानांची खैरात झाली; तसेच दाजीकाकांच्या उद्योगाला `वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलची संलग्न भागीदारी’ हा दुर्मिळ सन्मानही मिळाला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.